हातापायाला ६ बोटे असलेले ब्राझीलमधील कुटुंब

brazil
ब्राझीलमधील एका बड्या कुटुंबातील १४ व्यक्ती विशेष वैशिष्ठ असलेल्या आहेत. या सर्वांच्या हातापायाला पाचऐवजी सहा बोटे आहेत. विशेष म्हणजे एरवी वैग्युण्य समजल्या जाणार्‍या या प्रकाराला हे कुटुंब मात्र वरदान मानते आहे. ही विलक्षण खासियत फायद्याचीही कशी ठरते याचा जणू पाठच हे कुटुंब जगाला शिकवू पाहते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेनेटिक गडबडीमुळे हा प्रकार घडला आहे. डिसिल्व्हा कुटुंबात एकूण २६ सदस्य आहेत त्यापैकी १४ जणांच्या हातापायाला सहासहा बोटे आहेत. मात्र या सहा बोटांचा फायदा गिटार वाजविणे, पियानो वाजविणे अथवा गोलकिपिंग करण्यासाठी अधिक होतो असा त्यांचा दावा आहे. १५ वर्षीय ओआसो डिसिल्व्हा या कुटुंबातील किशोर मुलगा गोलकिपर आहे. तो म्हणतो सहा बोटे असल्याने माझा हात मोठा आहे व त्यामुळे बॉल पकडणे मला अधिक सोपे जाते. फक्त हातमोजे खरेदी करताना अडचण येते. मला दोन जोड घ्यावे लागतात व त्यातील एकाचे एक बोट कापून ते जोडून सहा बोटांचा हातमोजा बनवावा लागतो. तो उत्तम गिटारवादकही आहे.

या घरातील आठ वर्षांची चिमुरडी मारिया पियानो वाजविते. ती म्हणते, माझे शिक्षकही त्यांना सहा बोटे असायला हवी होती असे म्हणतात कारण त्यामुळे वाजविणे सहज सोपे होते शिवाय पियानो पट्टयांवरच्या सर्व सुरांपर्यंत बोटे सहज नेता येतात. या कुटुंबातील महिला मजेने सांगतात आम्हाला बाकी कांही अडचण कधीच येत नाही मात्र दागिने खरेदी करताना जादा खरेदी करावी लागते. सहा बोटे असल्याने अंगठ्या घेताना एका जास्तीच्या बोटासाठी जादा खर्च करावा लागतो.

Leave a Comment