गोळ्या-इंजेक्शनशिवाय मधुमेहावर उपचार

insuline
सॅन फ्रान्सिस्को : दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याच्या कटकटीतून मधुमेहाच्या रुग्णांची मुक्तता होणार असून अमेरिकी शास्त्रज्ञांनी इन्सुलिन निर्मिती करणा-या पेशींची संख्या वाढवणारे तंत्र शोधून काढले आहे. १४ मधुमेही रुग्णांवर या उपचार पद्धतीचा यशस्वी प्रयोगही करण्यात आला आहे.

कोट्यवधी टी-रॅग्ज पेशी सुदृढ लोकांच्या शरीरात आढळतात. त्या इन्सुलिन निर्मिती करणा-या पेशींचे संरक्षण करतात. टाइप-१ च्या मधुमेही रुग्णांमध्ये या पेशींची संख्या पुरेशा प्रमाणात नसते. त्यामुळे त्यांना शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज इंजेक्शनद्वारे इन्सुलिन घ्यावे लागते. शास्त्रज्ञांनी मधुमेही रुग्णांच्या शरीरातून टी-रॅग्ज पेशी काढल्या. प्रयोगशाळेत त्यांची संख्या १५०० पटींनी वाढवली. मग त्यांनी सामान्यपणे काम करावे म्हणून त्या पुन्हा शरीरात टाकण्यात आल्या. या उपचाराचे प्रारंभिक परिणाम चांगले आले आहेत. १४ मधुमेहींना ही उपचार पद्धती देण्यात आली आहे. या सर्व लोकांना जवळपास वर्षभर इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरजच पडली नाही. या सर्वांचे वय १८ ते ८३ दरम्यानचे आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. जेफर ब्लूस्टोन सांगतात की, हे परिणाम परिदृश्यच बदलणारे आहेत. आम्ही टी-रॅग्ज पेशींचा उपयोग रोगप्रतिकारक क्षमता पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी केला आणि त्याच वेळी आजाराची दिशाही नियंत्रित करण्यातही यशस्वी ठरलो. टी- रॅग्ज ही उपचार पद्धती मधुमेहावरील उपचारात मोठी भूमिका निभावेल याची आम्हाला खात्री आहे. यामुळे केवळ दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्यापासूनच सुटका होणार नाही तर मधुमेहामुळे डोळे आणि अन्य अवयवांवर होणारे दुष्परिणामही टाळता येतील.

ज्या मधुमेहग्रस्तांना ही उपचार पद्धती देण्यात आली त्यात ३९ वर्षीय बालमानसोपचारतज्ज्ञ मेरी रुनीचाही समावेश आहे. ती चार वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त आहे. ही उपचार पद्धती देण्यात आलेली रुनी ही पहिलीच रुग्ण आहे. ती सांगते, हा अद्वितीय उपचार आहे. दररोज इंजेक्शन घेण्याच्या कटकटीतून मी मूक्त झाले. ही एक संधी आहे, हे मला माहीत होते. यशस्वी होऊ शकते आणि नाहीसुद्धा. परंतु मी प्रामाणिकपणे संपूर्ण प्रक्रियेत भाग घेतला. ही पद्धती ह्रदय व रूमेटाइड ऑर्थरायटिससारख्या आजारांवरही अत्यंत उपयुक्त ठरेल, असा संशोधकांचा दावा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment