आपल्या राजकीय स्वार्थापोटी मोदी करत आहेत भारतीय सैन्याचा वापर – वृंदा करात

vrinda-karat
नवी दिल्ली – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (मार्क्सवादी) ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदी हे आपल्या राजकीय स्वार्थापोटी भारतीय सैन्याचा वापर करत असल्याचे म्हटले आहे.

हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर या हल्ल्यात केवळ झाडेच पाडली गेली काय असा सवाल मोदी सरकारला सर्वच स्तरातून विचारला जात आहे. याबाबत काही प्रसार माध्यमांनी दाखविलेल्या छायाचित्रांमध्ये तेथील इमारती पडलेल्या दिसल्या होत्या. पण यावर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेल्या वार्तांकनानुसार भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही येथील परिस्थिती जशास तशीच असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचे पुरावे जनतेसमोर राष्ट्रहितासाठी मांडले जावेत, असे करात यावेळी म्हणाल्या.

विरोधकांसोबत चर्चा करण्याचे मोदी वारंवार टाळतात. त्याचबरोबर मोदी सर्वपक्षीय बैठकीलाही उपस्थित नव्हते. यावरुन विरोधकांप्रती असलेला त्यांचा अनादर दिसून येतो, असेही करात म्हणाल्या. काश्मिरी विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा संघाची मानसिकता दर्शवत असल्याची टीका त्यांनी केली. डायलेक्सियावरुन पंतप्रधान मोदींनी केलेल्या त्या वक्तव्यावरही करात यांनी टीका केली. पंतप्रधान मोदींचे ते सर्वात दुर्दैवी वक्तव्य होते. देशात अनेक दिव्यांग लोक आहेत. मोदी सरकारने केवळ जुमलेबाजी केली असून वास्तवात काहीच केले नसल्यामुळे हे लोक निराश झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment