सीमेवरील या गावाच्या सुरक्षेची कमान महिलांच्या हाती

peerpanjal
आज महिला दिनाच्या निमित्ताने गावाच्या सुरक्षेचा जिम्मा सांभाळणाऱ्या वीर महिलांचा परिचय माझा पेपरच्या वाचकांसाठी करून देत आहोत. भारत पाक सीमेवरील जम्मूकाश्मीरच्या पुंछ भागातील मोहरा कलाल या गावाची सुरक्षा महिलांच्या हाती असून एकेकाळी दहशद्वाद्यानी उच्छाद मांडलेल्या या गावात आज एकही दहशतवादी प्रवेश करण्याचा विचारही करू शकत नाही कारण या गावातील महिलांनी त्यांना बसविलेली जरब हे आहे.

या महिला रायफली घेऊन गावात गस्त घालतात. २० किमी परिसरात गावाचा पसारा आहे. येथे बहुतेक गुज्जर समुदाय असून जम्मू काश्मीर मधील सर्वात मोठी ग्राम सुरक्षा समिती येथे आहे. या समितीत १८० सदस्य असून त्यात १०० महिला आहेत. या दलाचे नेतृत्व महिलांकडे आहे. २००१ साली अतिरेक्यांनी या गावातील १८ जणांना ठार केले होते त्यात लहान मुले आणि वृद्ध होते. समिती सदस्य शकीला सांगते आमच्या डोळ्यादेखत आमच्या लोकांचे प्राण जाताना आम्ही पहिले. दहशतवाद्यांना आम्ही आमचे गाव त्यांच्या ताब्यात द्यावे आणि राष्ट्रविरोधी कारवायात त्यांना मदत करावी असे वाटत होते पण कोणत्याच किमतीवर आम्ही ते मान्य केले नाही.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी येथे यावे आणि आमच्या मुलीसुनांबरोबर गैरवर्तणूक हे आम्हाला कधीच मान्य नव्हते आणि म्हणून महिलांनीच हत्यार उचलण्याचा निर्धार केला. लष्करातील अधिकारी पुढे आले आणि त्यांनी आम्हाला हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण दिले. गावाची एकजूट हेच दहशवाद्याविरोधातले मुख्य हत्यार आहे याची जाणीव होती. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला ब्रिगेड सज्ज झाली.

२००५ मध्ये येथे सर्प विनाश मोहीम राबविली गेली आणि सहा महिन्यात गाव दहशतवादी मुक्त करण्यात आले. सेनेने येथे कायमस्वरूपी मजबूत घरे उभारून दिली असून हिवाळ्यात पुरुष मेंढ्या चरण्यासाठी मैदानी प्रदेशात जातात कारण तेव्हा येथे बर्फ असते. त्यावेळी महिलाच गावाचे रक्षण करतात. या महिला रायफल, एके ४७, एके ५६ अशी हत्यारे लीलया हाताळतात.

Leave a Comment