मोदींपासून सुरु करा राफेल प्रकरणाच्या चोरी गेलेल्या फाईलचा तपास

rahul-gandhi
नवी दिल्ली – काल सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून राफेल विमानाच्या कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती दिल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोदी यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडत या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कसून चौकशी व्हावी, असे म्हटले आहे.

ज्या प्रमाणे राफेल कराराची कागदपत्रे गायब झाली आहेत. त्याच प्रमाणे देशातून नोकऱ्या, डोकलाम आणि शेतकऱ्यांचे मुद्दे गायब होत आहेत. त्यासाठी हे भाजप सरकार सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी दरम्यान राफेल कराराच्या कागदपत्रांची फाईलच चोरी झाली, असे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी न्यायमूर्तींना सांगितल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत ही पत्रकार परिषद बोलावली होती.

सर्वांना न्याय देण्याचे आपण बोलत असाल तर पंतप्रधानांचाही राफेल प्रकरणावरुन तपास होणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. लढाऊ विमानाच्या कराराची फाईल चोरी होते आणि त्याचा आरोप पत्रकारांवर लावला जातो, हे लज्जास्पद आहे, असेही गांधी म्हणाले. पण तब्बल ३० हजार कोटी रुपये ज्या व्यक्तीच्या खिशात टाकण्यात आले त्यावर कोणतीही कारवाई करण्यास सरकार तयार नाही, असे का? असा सवालही यावेळी राहुल गांधी केला. मोदी यांच्यापासून चोरी गेलेल्या फाईलच्या तपासाची सुरूवात व्हावी. कारण पंतप्रधान कार्यालयाने या कागदांमध्ये कराराच्या वेळी समांतर बोलणी केली होती, असे नमूद असल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.

Leave a Comment