पुढच्या वेळी अशी कारवाई करताना टीका करणाऱ्यांना देखील विमानाला बांधून न्या

VK-singh
नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मिरमध्ये एरियल स्ट्राईकवर शंका घेणाऱ्यांवर केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी जोरदार टीका केली आहे. आगामी काळात हवाई दलाकडून अशी कारवाई करताना शंका घेणाऱ्यांना देखील विमानाला बांधून घेऊन जा, असे व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे.

माजी लष्करप्रमुख आणि आता केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या व्ही. के. सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एरियल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. पुढच्या वेळी जेव्हा अशी कारवाई होईल, तेव्हा विरोधी पक्षांमधील जी मंडळी या कारवाईवर शंका घेत आहेत, त्यांनाही हवाई दलाने विमानाखाली बांधून सोबत नेले पाहिजे, असे मला वाटते. बॉम्ब जेव्हा टाकले जातील, तेव्हा ते पाहू शकतील. त्यानंतर त्यांना तिथेच सोडावे, जेणेकरून ते हल्ल्यात किती मेले याची माहिती घेऊनच ते माघारी येतील.

या आधीही एरियल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणारे विरोधी पक्षनेते, प्रसारमाध्यमे आणि विद्यार्थी नेत्यांवर व्ही. के. सिंह यांनी टीका केली होती. सध्याची परिस्थिती पाहता देशांतर्गत भागातही एक सर्जिकल स्ट्राईक होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारताने दहशतवादाचा सामना करण्यासाठी इस्राइलचे अनुकरण केले पाहिजे, असे देशातील जनतेला वाटते. मात्र असे विरोधी पक्ष असतील तर ते होणार नाही. इस्राइलमधील विरोधी पक्ष आपल्या सैन्यावर संशय घेत नाही. तसेच त्यांना अपमानितही करत नाही. जेव्हा लष्कराकडून ऑपरेशन म्युनिकसारख्या कारवाई केली जाते, तेव्हा तिच्यावर शंका घेतली जात नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले.

Leave a Comment