भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वातील टीमने स्टेम सेल्सच्या सहाय्याने दूर केला एड्स!

HIV
लंडन – ब्रिटनमध्ये एका एचआयव्ही रुग्णावर स्टेम सेल्सच्या मदतीने यशस्वीरित्या उपचार करण्यात आला आहे. उपचार होऊन 18 महिने झाले आहेत. या रुग्णाच्या शरीरात तेव्हापासून आतापर्यंत एचआयव्हीचे जिवाणू सापडलेले नाहीत. यासोबतच त्यांना एचआयव्हीच्या औषधींची सुद्धा गरज पडलेली नाही. असे असले तरीही संबंधित व्यक्ती पूर्णपणे बरा झाल्याचे सांगता येणार नाही असे संशोधकांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हा प्रयोग भारतीय वंशाचे वैज्ञानिक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वातील टीमने केला आहे.

संबंधित रुग्णाला गेल्या 18 महिन्यांपासून एचआयव्हीच्या औषधी घ्याव्या लागल्या नाहीत. या व्हायरसचे चिन्ह सुद्धा त्याच्या शरीरात सापडले नाहीत. ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या वृत्तानुसार, तरीही तो पूर्णपणे बरा झाला किंवा नाही यावर सांगणे घाई असेल असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. स्टेम सेल्सच्या मदतीने ज्या रुग्णावर उपचार करण्यात आले तो एक पुरुष असून लंडनचा रहिवासी आहे. 2003 मध्ये त्याला एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याला 2012 मध्ये हॉजकिन्स कॅन्सर झाला. कॅन्सरवर उपचार करत असताना कीमोथेरेपी करण्यात आली होती. यासोबतच, रुग्णाच्या शरीरात एका निरोगी व्यक्तीचे स्टेम सेल्स इंप्लांट करण्यात आले होते. त्याचा कॅन्सर आणि एचआयव्ही हे दोन्ही रोग या उपचाराने थांबले आहेत. या रोगाची चिन्हे सुद्धा शरीरात सापडत नाहीत.

अशा पद्धतीने उपचार केल्याची ही दुसरी वेळ आहे. पहिला प्रयोग बर्लिनचा रहिवासी टिमोथी ब्राउनवर झाला होता. त्याला एचआयव्ही एड्स आणि ल्युकेमिया अशा दोन तक्रारी होत्या. त्याच्या शरीरात रेडिओथेरेपी आणि स्टेम सेल्स वाढवून इंप्लांट करण्यात आले. एचआयव्हीचे जिवाणू सुद्धा त्याच्या शरीरातून नष्ट झाले. ज्या दोन रुग्णांवर आतापर्यंत प्रयोग करण्यात आला ते दोघेही एचआयव्हीसह दुसऱ्या एका रोगाने बाधित होते. अशात फक्त एचआयव्ही असलेल्या रुग्णावर हे उपचार कसे काम करणार याची शाश्वती देता येणार नाही. सोबतच, त्या दोन्ही रुग्णांवर संशोधक लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर उपचार अजुनही संपलेले नाहीत.

लंडनमध्ये झालेला प्रयोग युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इम्पेरियल कॉलेज लंडन, केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ अशा नामवंत इंस्टिट्युटच्या संशोधकांनी केला. तर या संपूर्ण टीमचे नेतृत्व भारतीय वंशाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रोफेसर रवींद्र गुप्ता करत होते. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये ते संशोधक आहेत. हा प्रयोग अंतिम नसला तरीही यातून संशोधकांना या दुर्धर आजारावर उपचाराची दिशा अवश्य मिळाली असल्याची प्रतिक्रिया आणखी एक संशोधक प्रोफेसर एड्वार्डो ओलाव्हेरिया यांनी दिली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment