इव्हीएमद्वारेच घेतल्या जातील लोकसभा निवडणुका – निवडणूक आयुक्त

sunil-arora
नवी दिल्ली – अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभा निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातूनच घेतल्या जातील असे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकांवरही आपले मत व्यक्त केले.

१७ व्या लोकसभा स्थापनेच्या दिशेने देश वाटचाल करत असून निवडणुकांच्या तारखा कोणत्याही वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. सामान्य मतदाराच्या मनात या निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम बद्दल अनेक संभ्रम आहेत. अशातच मागच्या महिन्यात अमेरिकेमध्ये सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीने ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड करता येऊ शकतो, असे जाहीर पत्रकार परिषदेतून सांगितल्यामुळे ईव्हीएमबद्दल असेलला भ्रम अधिकच बळावला आहे. पण ईव्हीएमच्या माध्यमातूनच या निवडणुका होतील, असे अरोरा यांनी म्हटले आहे.

ईव्हीएमचा मागच्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकानंतर अनेक निवडणुकांमध्ये उपयोग झाला. ईव्हीएमद्वारे दिल्ली, कर्नाटक आणि नुकतेच ४ राज्यांमधील निवडणुका या यशस्वीपणे पार पडल्या. वेगवेगळे पक्ष या निवडणुकांमध्ये विजयी झाले. तसेच त्यांना पडलेल्या मतांमध्ये मोठा फरक होता. यावरून ईव्हीएमच्या वैधतेवर आक्षेप घेता येणार नाही, असे अरोरा म्हणाले. आगामी निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातून होतील. यामध्ये शंकाच नाही, असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.

जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. तेथे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची गरज आहे. या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबतच होणार का, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तेथे निवडणूक लढवणाऱ्या पक्षांनी एकत्र निवडणुका घेण्यास सहमती दर्शवली तर, आपल्याला लोकसभेसोबत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेता येतील, असे अरोरा यांनी सांगितले.

Leave a Comment