
नवी दिल्ली : महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महाधिवक्त्यांची सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक माहिती, चोरीला गेली राफेल कराराची कागदपत्रे
संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्र समोर आणणे हा गुन्हा असल्यामुळे याबाबतचा तपास सुरू असून हे एक संवेदनशील प्रकरण असल्याचे के.के वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. दरम्यान, राफेल मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राहुल गांधींनी केली आहे. मोदी सरकारने राफेल विमानांची अचानक किंमत वाढवली. तसेच भारतातील अनुभवी कंपनी ‘एचएएल’ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केले असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
