काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे मृतदेह मोजावेत

rajnath-singh
दिसपूर – भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या एरियल स्ट्राईकमध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला, असा सवाल विरोधक केंद्रातील भाजप सरकारला विचारत आहे. या उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना त्यांची इच्छा असेल तर त्यांनी पाकिस्तानातील त्या ठिकाणी जाऊन दहशतवाद्यांचे मृतदेह मोजावे असा सल्ला दिला आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या किती दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकमध्ये झाला हे आज ना उद्या समोर येईलच. त्यासंदर्भातील पुरावेही आपण प्रसिद्ध करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने (एनटीआरओ)एका अहवालात घटना स्थळी ३०० मोबाईल सक्रिय होते, अशी माहिती दिली आहे. म्हणजेच तेथे जवळपास ३०० लोक होते, असा दावाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.

एनटीआरओ ही प्रमाणिक प्रणाली आहे. तेथे ३०० मोबाईल सक्रिय होते असे त्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ त्या फोनचा उपयोग झाडं करीत होते का? आता आपण एनटीआरओवरही आक्षेप घेणार का? असा सवालही राजनाथ सिंह यांनी यावेळी दागला. सरकार बनवताना खालच्या स्तराचे राजकारण करू नये. राजकारण करायचेच असल्यास देश निर्माण करणारे राजकारण करावे. तुम्हाला मृतांचा आकडाच हवा असेल तर, पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांनाच विचारा किती दहशतवादी मारण्यात आले, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

Leave a Comment