सुपारीबाज ट्रोलर्संना बदडून काढा – प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar
अकोला – देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. त्याचबरोबर देशातील नेत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्याच पार्श्वभूमिवर अशा ट्रोलर्सना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सज्जड दम दिला आहे. लोकशाहीत टीका करणे हे स्वाभाविक आहे, पण टीका करणारी व्यक्ती प्रामाणिक असावी. पण यात काही सुपारी घेऊन ट्रोल करणाऱ्यांना तुडवून काढल्याशिवाय पर्याय नसतो. अशा सुपारीबाज ट्रोलर्सला बदडून काढा, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.

ट्रोलर्सविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझ्यावर प्रसारमाध्यमांतून टीका करणाऱ्याबद्दल मला काही एक म्हणायचे नाही आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात काही एक राग नाही. त्याचबरोबर माझी आता राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांबद्दल आता ठोकशाहीची भूमिका असणार आहे. सुपारीबाज टीकाकारांना ठोकून काढा. मला जे ट्रोल करतील त्यांना आमचे कार्यकर्ते पाहून घेतील. समोरच्या हुकूमशहाविरोधात माझा लढा असल्यामुळे काही बाबतीत मला सुद्धा हुकूमशहासारखे वागावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना लक्ष्य करणारा एरियल स्ट्राईक हवाई दलाने केला. परंतु या कारवाई संदर्भात संभ्रम निर्माण झाला असून सैन्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत छायाचित्रांसह संबंधित पुरावे प्रसिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Comment