बॉबी डार्लिंगची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

bobby-darling
बॉबी डार्लिंग हे सिनेसृष्टीतील बहुचर्चित नाव असून त्याचे पंकज शर्मा असे मूळ नाव होते. त्यानंतर २०१५ साली बॉबीने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केल्यानंतर पाखी शर्मा असे नाव बदलून रमणीक शर्मा या व्यावसायिकाशी तिने २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. पण बॉबीने वर्षभरातच आपल्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि अनैसर्गिक शारिरीक संबंधासाठी दबाव टाकल्याची तक्रार दाखल करत वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दरम्यान तिच्या पतीने हे लग्नच कायदेशीर नसल्याचे म्हटले आहे.

तिच्यासोबतचे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार वैध आहे का असा प्रश्न बॉबीच्या पतीने न्यायालयात उपस्थित केला आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार स्त्री आणि पुरुष यांच्यातील विवाह कायदेशीर असतो. बॉबीने लग्न करताना लिंग परिवर्तन केल्याची माहिती विवाह नोंदणी अधिकाऱ्याला दिली नसल्यामुळे हे लग्नच बेकायदेशीर असल्याचा मुद्दा त्याने न्यायालयात उपस्थित केला. तर बॉबीने विवाह नोंदणी करताना तिची सर्व ओळखपत्रे दाखवली होती. त्यात ती स्त्री असल्याचे स्पष्ट लिहिले होते. बॉबीच्या पतीने तिचे सर्व गिफ्ट डीड पत्नी म्हणूनच स्विकारले होते. पाखी शर्मा हेच नाव त्या वस्तूंवर होते. बॉबीला जर तू पत्नी मानत नाहीस तर तिचे सर्व भेटवस्तू आणि संपत्ती परत कर, असा युक्तिवाद बॉबीच्या वकिलांनी केला.

बॉबीने सप्टेंबर २०१७ मध्ये दिल्ली पोलिसांकडे पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. तिने त्यावेळी कौटुंबिक हिंसाचार आणि अनैसर्गिक सेक्सचा आरोप केल्यानंतर मार्च २०१८ मध्ये त्याला अटकसुद्धा झाली होती. दारुच्या नशेत रमणीक मला मारहाण करत असे. माझी संपत्ती आणि पैसे त्याने बळकावले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील फ्लॅटचा सहमालक बनवण्यासाठी तो माझ्यावर दबाव टाकत असल्याचे बॉबीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Comment