लवकरच कॉकपिटचा ताबा घेणार विंग कमांडर अभिनंदन

abhinandan-vardhaman
नवी दिल्ली – लवकरात लवकर कॉकपिटमध्ये वैमानिकाच्या जागेवर भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान परतणार असून हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि डॉक्टरांकडे अभिनंदन यांनी स्वतःहून ही मागणी केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील २ दिवसांपासून अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना मानसिक त्रास दिल्याचे मानसिक उपचारांदरम्यान समोर आले होते. तसेच, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. पाकिस्तानने आपल्या वैमानिकाला अयोग्य वागणूक दिल्याचा आक्षेप या प्रकारावरून भारताने घेतला होता. पण धीराने सर्व प्रसंगाचा अभिनंदन यांनी सामना केला. अभिनंदन यांची त्यांच्या पत्नी, बहीण आणि मुलासह भेट संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनीही घेतली होती. सीतारामन यांनी त्यांची विचारपूस केली होती.

सध्या सैन्याच्या रुग्णालयात अभिनंदन असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले असून लवकरात लवकर ते आपल्या सेवेत रुजु होतील, यादृष्टीने इलाज सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. अभिनंदन यांचे पाकिस्तानकडून मानसिक त्रास देण्यात आल्यानंतरही धैर्य मजबूत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Leave a Comment