मसूद अजहरच्या निधनाच्या निव्वळ वावड्या

masood-azhar
नवी दिल्ली – काल अनेक माध्यमांमध्ये क्रुरकर्मी मौलाना मसूद अझहरचे निधन झाल्याचे वृत्त फिरत होते. पण पाकिस्तानच्या एका माध्यमाने तो जिवंत असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. तथापि, रावळपिंडीतील पाक लष्कराच्या रुग्णालयात मसूद उपचार घेत असल्याची माहिती शनिवारी समोर आली होती.

भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाक व्याप्त काश्मिरमध्ये एरियल स्ट्राईक केला होता. जैशच्या दहशतवादी तळांवर हा हल्ला करण्यात असल्याचे भारताच्यावतीने म्हटले जात आहे. मोठ्या प्रमाणात दहशतवादी या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मसूद देखील या हल्ल्यात जखमी झाला होता आणि त्याचा मृत्यू झाला, अशा अनेक बातम्या सुत्रांचा हवाला देत प्रसारित करत होत होत्या.

मागील अनेक दिवसांपासून मसूद अजहर हा आजारी आहे. त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या असून नेहमी डायलिसिसवर ठेवावे लागते. यासाठी मसूदला नियमित उपचारासाठी रुग्णालयात आणले जाते. त्याच्यावर रावळपिंडी येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहितीही पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दिली होती.

अद्याप मसूदचे निधन झाल्याचे कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नव्हती. त्याच्या मृत्यूची अफवा कोठून सुरू झाली, याबद्दलही तपास लागलेला नाही. मसूदचा मृत्यू होण्याच्या २ शक्यता माध्यमांवर मांडण्यात येत होत्या. त्यापैकी एक शक्यता एअर स्ट्राईकमध्ये जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात होते. दुसरी शक्यता मुत्रपिंडाच्या आजाराने त्याचा मृत्यू झाला, असे म्हटले जात होते.

Leave a Comment