अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदींनाच – स्मृती इराणी

smriti-irani
नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने शुक्रवारी रात्री सुटका केली. त्यांना पंजाबमधील वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर अभिनंदन यांनी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी मायभुमीत प्रवेश केला. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचे सर्व श्रेय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. अभिनंदन वर्धमान यांची नरेंद्र मोदींच्या पराक्रमामुळेच दोन दिवसांत पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

भारताचा सुपुत्र फक्त ४८ तासांत आज आपल्या स्वयंसेवकाच्या पराक्रमामुळे मायदेशी परतला असून याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूप अभिमान असेल, असे स्मृती इराणी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांचा इशारा होता. भाजपत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आरएसएस प्रचारक होते. स्मृती ईराणी भाजप नेते सुधांशू मित्तल यांच्या संघावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होत्या.

अभिनंदन यांचे मिग विमान भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा वेध घेत असताना अपघातग्रस्त होऊन २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. पाकिस्तानने त्यावेळी पॅराशूटद्वारे उतरत असलेल्या अभिनंदनला अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या दोन चित्रफितीही पाकिस्तानने जारी केल्या होत्या. त्यात त्यांना मारहाण झाल्याचेही जाणवत होत्या. या चित्रफितींवर भारताने जोरदार आक्षेप घेत, जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर पाकिस्तानवर अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीननेही दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची घोषणा केली होती.

Leave a Comment