अल्लाहच्या ९९ नावातही हिंसाचारचा उल्लेख नाही : सुषमा स्वराज

sushma-swaraj
अबुधाबी – भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या इस्लामिक देशांच्या (ओआयसी) बैठकीत सहभागी झाल्या असून त्यांनी या बैठकीत अपेक्षेप्रमाणे दहशतवादावर भाष्य केले आहे. आमच्या देशात हिंदू आणि मुस्लिम हे गुण्यागोविंदाने नांदतात, पण काही क्षुल्लक लोक हे कट्टरवाद्यांच्या जाळ्यात ओढले जातात. आमची जी लढाई सुरु आहे, तो केवळ दहशतवादाविरोधात असून आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात लढाई लढत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी इस्लाम शांततेचा मार्ग दाखवतो, तसेच अल्लाहच्या ९९ नावातही हिंसाचारचा उल्लेख नसल्याचे वक्तव्य केले.

सुषमा स्वराज या अबुधाबी येथे सुरु असलेल्या ओआयसीची परिषदेत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित आहेत. दरम्यान, पाकिस्तानने या परिषदेवर सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीमुळे बहिष्कार टाकला आहे. त्या पुढे म्हणाल्या, केवळ लष्करी किंवा कूटनीतीने दहशतवादाविरोधात लढले जाऊ शकत नाही. उलट धर्माचा खरा अर्थ समजून घेऊन त्याच्याशी लढा दिला जाऊ शकतो. धर्म जाणणाऱ्या विद्वानांनी यासाठी समोर आले पाहिजे. युवकांचे भविष्य वाचवावे लागेल. हिंसेचा मार्ग सोडला पाहिजे. ऋग्वेदात म्हटले आहे की, देव एक आहे पण लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे वर्णन करतात. जगातील सर्व धर्मांत हेच म्हटले आहे. दहशतवाद आणि कट्टरवाद दोन्ही एकच आहेत. इस्लामचा संदेश शांतता आहे. कुराणमध्ये म्हटले आहे की, धर्माची सक्ती असू नये.

Leave a Comment