लोहाघाट, नितांतसुंदर पर्यटनस्थळ

lohaghat
खरा निसर्ग अनुभवायचा असेल तर उत्तराखंड राज्याला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे राज्य उन्हाळ्याच्या सहलींसाठी लोकप्रिय आहे. पण बहुतेक पर्यटक मसुरी, चारधाम, नैनिताल, औली, चाक्राता, चोपता या ठिकाणी जातात. नैनितालपासून जवळ चंपावत जिल्यात लोहावती नदीकाठी वसलेले लोहाघाट हे ठिकाण मात्र अजून पर्यटकांना फारसे माहित नाही. पृथ्वीवरचे नंदनवन म्हणजे काश्मीर असेल तर लोहाघाट पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणता येईल.

हे ठिकाण निसर्गरम्य आहेच पण येथे अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनात रुची असलेल्यांना हे ठिकाण खूपच भावेल. शामला ताल, देविधुरा, गुरुद्वारा रिठासाहिब, अॅबॉट माउंट, बाणासुर किल्ला, मायावती म्हणजे अद्वैत आश्रम, फोर्टी व्हिलेज अशी अनेक ठिकाणे येथे जवळपास आहेत.

babasur
अद्वैत आश्रम रामकृष्ण मठाची शाखा असून देवदार, चीड वृक्षांच्या घनदाट परिसरात हा आश्रम आहे. स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने त्यांचे शिष्य स्वामी स्वरूपानंद आणि एका इंग्रजाने १८९९ मध्ये या आश्रमाची उभारणी केली. विवेकानंद यांनी येथे काही दिवस वास्तव्य केले होते.

lohagAT
बाणासुर किल्ला हे या भागाचे आकर्षण म्हणावे लागेल. श्रीकृष्णाने बाणासुर राक्षसाचा वाढ केला होता तोच हा बाणासुर. येथून एकीकडे हिमालयाच्या रांगा दिसतात तर दुसरीकडे अद्वैत आश्रमाचे दर्शन होते. स्वातंत्र्यापूर्वी जॉन अॅबॉट या ब्रिटीश माणसाने आसपासचे निसर्गसौंदर्य जेथून डोळ्यांनी पिता येते अश्या या छोट्या पर्वताचा शोध घेतला तेव्हापासून त्याला अॅबॉट माउंट असेच म्हणतात. चोहो बाजूनी दिसणाऱ्या हिमालयाच्या बर्फाळ पर्वतरांगा, हिरवळ, दऱ्या या ७ हजार फुट उंचीच्या पर्वतावरून पाहणे म्हणजे डोळ्याला मेजवानी.

लोहाघाटला जाण्यासाठी जवळचा विमानतळ पंतनगर येथे आहे. रस्ते मार्गानेही जाता येते आणि रेल्वेसाठी जवळचे स्टेशन टनकपूर हे आहे. येथे जाण्यासाठी सर्वोत्तम काळ एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते मार्च असा आहे.

Leave a Comment