अभिनंदन वर्धमान यांची देशवापसी

ABHINANDAN
नवी दिल्ली – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची देशवापसी झाली असून वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. वाघा बॉर्डरवर सकाळपासूनच लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही अभिनंदन यांचे आगमन होणार असल्या कारणाने रद्द करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी शुक्रवारी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली. इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचे संसदेत बोलताना सांगितले. भारताकडून अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावे अशी मागणी कऱण्यात आली होती. पाकिस्तानने कोणतीही चर्चा न करता आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

आमचे शांततेसाठीचे हे पहिले पाऊल आहे, असा कांगावा पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला.

Leave a Comment