आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०० षटकारांचा टप्पा ख्रिस गेलने केला पार

chris-gayle
इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात २९ धावांनी विजय मिळवला आणि २-१ अशी ५ सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४१८ धावांचा डोंगर उभा केला. वेस्ट इंडिजला मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना ३८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. पण ख्रिस गेलने या सामन्यात झंझावाती खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०० षटकारांचा टप्पा पार केला.

गेलने इंग्लंडने दिलेल्या ४१९ धावांचा पाठलाग करताना तुफान खेळी केली. ९७ चेंडूत त्याने १६२ धावा कुटल्या. त्याने या खेळीत तब्बल १४ षटकार लगावले आणि ११ चौकाराची जोड दिली. त्याने या १४ षटकाराच्या मदतीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०० षटकारांचा टप्पादेखील गाठला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार फटकावणारा ख्रिस गेल पहिलाच क्रिकेटपटू ठरला. तसेच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० हून षटकार लगावणारा पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनंतर दुसरा क्रिकेटपटू ठरला. तसेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पादेखील गाठला.

Leave a Comment