भारतीय हद्दीत पाकिस्तानी विमानांची घुसखोरी, पाकचे एक विमान भारताने पाडले

pakistan
नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाकच्या या विमानांनी सीमेरेषेवरील नौशेरा सेक्टरपर्यंत घुसखोरी केली होती. दरम्यान जम्मू- काश्मीरमधील राजौरी परिसरात पाकिस्तानच्या हवाई दलाकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पण पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हवाई दलाच्या चोख प्रत्युत्तरानंतर पळ काढला.

याबाबत अद्याप भारत सरकार किंवा हवाई दलाकडून कोणतीही खात्रीलायक माहिती देण्यात आलेली नाही. मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरले असून भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे पाककडून म्हणण्यात आले होते. त्यावरुन हि कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

त्यापार्श्वभूमिवर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी इम्रान खान यांच्या इशाऱ्यानंतर भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. हवाई दलाने प्रत्युत्तर देताच तिन्ही विमाने माघारी परतली, असे समजते. या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्बहल्ला केला. त्यांनी भारतीय सैन्याच्या चौकीजवळ बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पाकने घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर श्रीनगर, लेह आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या तिन्ही विमानतळांवरील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या विमानतळांवरील सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment