या शहाणपणाला दृष्ट न लागो

airforce
पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाला भारताने सज्जड उत्तर दिले आहे. गेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पाकिस्तानच्या जखमा अद्याप भरल्या नव्हत्या तोच भारतीय वायुसेनेच्या वीरांनी आणखी एक दणका दिला. पाकिस्तानच्या सीमेत जाऊन तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांना हवाई दलाच्या वीरांनी कंठस्नान घातले. हा हल्ला तर सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा आहे, मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघांकड़ूनही त्यावर ज्या संयमित प्रतिक्रिया आल्या, त्या दाद देण्याजोग्या म्हणाव्या लागतील. सर्जिकल स्ट्राईकनंतर सत्ताधारी पक्षाने त्या कारवाईचे श्रेय घेण्याचा पूरेपूर प्रयत्न केला होता, तर विरोधकांनी त्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे करून थेट लष्कराच्या कर्तृत्वावरच शंका घेतली होती. यावेळच्या एरियल स्ट्राईकनंतर मात्र परिस्थिती अत्यंत वेगळी दिसत आहे.

भारतीय सेनेचे स्पेशल कमांडो 28-29 सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानच्या सीमेत (पाकव्याप्त काश्मिरमध्ये) शिरले आणि त्यांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. ही कारवाई पूर्ण केल्यानंतर आपले जवान सुखरूप परतही आले. उरी व पठाणकोट येथे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा बदला असे त्या कारवाईचे वर्णन करण्यात आले होते. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर 29 सप्टेंबरच्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल रणबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते, मात्र संपूर्ण कारवाईची माहिती ले. जनरल रणबीर सिंह यांनी दिली. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सीमेत जाऊन दहशतवाद्यांचा कसा खात्मा केला, याचे त्यांनी वर्णन केले.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या कारवाईचे श्रेय घेण्याची खूप धडपड केली. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत धडा शिकविणे हा भाजपच्या 2014 च्या निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे आपल्या कार्यकाळात झालेल्या या कारवाईचे श्रेय घेण्यासाठी या पक्षाची अहमहमिका समजण्यासारखी होती. सकाळी बातमी आल्यापासून मोठ्या प्रमाणात ट्वीट करण्यात आले. टीव्हीवरील चर्चांमध्ये या मुद्द्यावर हिरीरीने पक्षाची बाजू मांडण्यात आली. इतकेच नव्हे तर 2017च्या सुरूवातीला झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकला प्रमुख मुद्दा बनविले होते. भारताच्या इतिहासात अशा प्रकारची कारवाई कधी न झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.

दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससहित अन्य राजकीय पक्षांनी सरकाचीच नीयतच खोटी असल्याचा आरोप केला होता. सर्जिकल स्ट्राईकच मुळात खोटे असल्याचे सुद्धा सांगण्यात आले. भारताच्या जनतेला सर्जिकल स्ट्राईक हवे आहेत, परंतु खोटे नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले होते. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर पाकिस्तानी माध्यमांचा हवाला देत सर्जिकल स्ट्राईकवर शंका व्यक्त केली होती. त्यावरून केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शनेही झाली होती. हा पहिलाचा सर्जिकल स्ट्राईक नसून मनमोहन सिंह यांच्या काळातही अशी कारवाई झाल्याचा दावा करून या कामगिरीचे महत्त्व कमी करण्याचाही प्रयत्न झाला होता.

मंगळवारी भारतीय वायुसेनेने हवाई हल्ले करून आपली ताकद दाखवली तेव्हा मात्र असे काही झाले नाही, हे शुभसूचकच म्हणायला हवे. या कारवाईची घोषणा परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केली, कोण्या मंत्र्याने नव्हे. त्यांनी अत्यंत मोजक्या आणि संयत शब्दांत या कारवाईचे वर्णन केले.

पुलवामाच्या हुतात्म्यांचा सूड घेतल्याबद्दल देशभरात समाधानाची भावना असली, तर त्यात उथळपणा नव्हता. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही कारवाई म्हणजे महापराक्रम असल्याचे सांगितले. संपूर्ण देश वायुसेनेसोबत उभा असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या कारवाईबद्दल वायुसेनेच्या वैमानिकांना सलाम केला, तर यामुळे पाकिस्तानला कठोर संदेश जाईल असा विश्वास माजी संरक्षणमंत्री यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वायुसेनेचे अभिनंदन केले. अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून हवाई दलांच्या वैमानिकांच्या शौर्याला सलाम केला. इतकेच नव्हे तर आपले नियोजित उपोषण स्थगित करण्याचीही घोषणा केली.

थोडक्यात म्हणजे देशातील सर्व जबाबदार लोकांनी या घटनेचे गांभीर्य मनात ठेऊन पदाला व स्थानाला साजेसे वर्तन केले. त्यामुळे या हल्ल्याचा तमाशा झाला नाही. या शहाणपणाला दृष्ट न लागो, असेच देशातील जनता म्हणेल.

Leave a Comment