बालाकोट हल्ल्याच्या वेळी तैनात होते हे पहारेदार विमान

paharedar
भारत पाक नियंत्रण रेषा ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताच्या मिराज २००० जातीच्या १२ लढाऊ विमानांच्या ताफ्याने बालाकोट, चाकोती आणि मुजफ्फराबाद येथे केलेल्या बॉम्बफेकीची जोरदार चर्चा जगभरात होत आहे. मात्र हा हल्ला चढविण्यापूर्वी हवाई दलाने फुलप्रूफ प्लॅन तयार केला होता आणि त्यासाठी पूर्ण सिस्टीम काम करत होती.

मिराज पाक हद्दीत घुसली आणि अवघ्या २० मिनिटात दहशदवादी तळ उध्वस्त करून सुखरूप मायदेशी परतली असली तरी कोणताही धोका होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार यासाठी एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम तंत्राचा वापर केला गेला. एडब्ल्यूएसीएस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाचा समावेश असलेले एक विमान सुरक्षित अंतरावर उडत होते आणि हल्ला करण्यासाठी गेलेल्या लढाऊ विमानांना शत्रूच्या परिसराची, तेथे होत असलेल्या हालचालींची माहिती सतत पुरवीत होते. मिराज विमाने बॉम्बफेक करत असतानाही हे विमान त्यांच्या सतत संपर्कात होते.

या तंत्रज्ञानामुळे ४०० किमी परिसरातील हालचाली हे विमान अचूक टिपत होते तसेच पाकिस्तानी हवाई दलावर नजर ठेवण्याचे काम ते पार पाडत होते. या तंत्रज्ञानाचा वापर केलेली विमाने ट्रॅक करणे अवघड असते मात्र हि विमाने शत्रूची क्षणाक्षणाची माहिती मिळवू शकतात. संरक्षणात्मक आणि आक्रमक अश्या दोन्ही जबाबदाऱ्या हि विमाने पार पाडू शकतात. त्यामुळे यांना पहारेदार विमाने म्हटले जाते.

मिराज विमाने पाकमध्ये बॉम्ब टाकत होती तेव्हा सुखोई ३० एमकेआय नियंत्रण रेषेजवळ उडत होती. मदतीची गरज भासल्यास हि विमाने तयार होती तसेच या वेळी ड्रोनचा वापर ही केला गेला होता.

Leave a Comment