सर्जिकल स्ट्राईक 2 – भारताचा अबोटाबाद क्षण

air-force
दोन मे 2011 चा दिवस आठवतोय का? बहुतांश जग झोपेत असताना त्या दिवशी अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे हल्ला केला होता आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला यमसदनी पाठवले होते. अबोटाबाद येथील एका आलिशान हवेलीत पाच वर्षे लादेन रहात होता. इस्लामाबादपासून केवळ 65 किमी अंतरावर असलेल्या अबोटाबाद येथे पाकिस्तानची सैनिकी प्रशिक्षणसंस्था व पाकच्या सैन्याचा तळही आहे. लादेन राहत असलेली इमारत पाकिस्तानच्या लष्कर प्रबोधिनीपासून हाकेच्या अंतरावर होती. अमेरिकी सैनिकांनी मोठी लष्करी मोहीम राबवून लादेनचा खात्मा केला.

आज, 26 फेब्रुवारी 2019 हा दिवस याच प्रकारे नोंदविला जाईल. बहुतांश भारतीय झोपेत असताना भारताने मंगळवारी पाकिस्तानात जाऊन हवाई हल्ले केले आणि अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य केले. प्राथमिक अंदाजानुसार या हल्ल्यात 200-300 दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे.

भारतीय वायुसेनेच्या 12 मिराज विमानांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट येथे हे हल्ले केले. विशेष म्हणजे सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे या हल्ल्यांबाबत कोणतीही संदिग्धता नाही. कारण स्वतः पाकिस्तानी सेनेनेच भारतीय वायुसेनेने मुझफ्फराबाद सेक्टरमधील नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ‘‘भारतीय वायुसेनेचे विमान मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये शिरले. पाकिस्तानी वायुसेनेकडून वेळेवर आणि प्रभावी उत्तर मिळाल्यानंतर गडबडीने ते बॉम्ब टाकून बालाकोटजवळून निघून गेले. प्राण किंवा मालाची कोणतीही हानी झाली नाही,’’ असे ट्वीट पाकिस्तानी सेनेची मीडिया शाखा असलेल्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (आईएसपीआर) के महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केले आहे.

अर्थात ही एक प्रकारची वल्गनाच म्हणायला पाहिजे कारण मिराज विमानांनी केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांची शिबिरे उद्ध्वस्त झाली आहेत, यात शंका नाही. पाकिस्तानच्या (अमेरिकेकडून मिळालेल्या) एफ 16 विमानांनी मिराज 2000 च्या विमानांच्या दिशेने उड्डाण केले होते, मात्र भारतीय विमानांचा ताफा पाहून ती विमाने परतली, असे एएनआय वृत्तसंस्थेला सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानी माध्यमांनी तर सुमारे 200-300 जण मरण पावल्याची शंका व्यक्त केली आहे.

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करावी, यासाठी भारत सरकारवर दबाव वाढला होता. भारताकडून कोणती तरी कारवाई होणार हे जवळपास सर्वांना माहीत होते. खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत काही तरी जबरदस्त कारवाई करणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे सीमेवरील तणाव वाढला होता आणि आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

पाकिस्तानचा हा दावा किती पोकळ होता, हे मंगळवारच्या हल्ल्याने दाखवून दिले आहे. अबोटाबादमध्ये ज्या प्रमाणे पाकिस्तानी सैन्याला आणि गुप्तचर संस्थांना बिलकुल सुगावा लागू न देता अमेरिकी सैन्याने लादेनला संपविला, त्याच प्रमाणे हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानचे रडार आणि अन्य संरक्षण व्यवस्थांना न जुमानता भारतीय हवाई दलाने आपले कर्तृत्व आकाशावर नोंदविले. ही संपूर्ण कारवाई तब्बल 21 मिनिटे चालू होती, यातूनच आपल्या जिगरबाज सैनिकांच्या आत्मविश्वास आणि शौर्याची चुणूक मिळते. पुलवामातील हल्ल्यानंतर 11 दिवसांनी भारतीय जवानांनी त्या 40 हुतात्म्यांचा सूड उगवला.

आतापर्यंत खलिते आणि चर्चा याच मार्गावरून जाणाऱ्या भारताच्या इतिहासात अशा प्रकारे कारवाई होणे हा एक अभूतपूर्व प्रसंग आहे. भारताला हजार जखमा करून रक्तबंबाळ करणे (ब्लीडींग थ्रू थाऊजंड कट्स) हा पाकिस्तानचा कावा आहे. हे पाकिस्तानचे भारताविरूद्धचे छुपे युद्ध आहे. त्याला भारताने चोख उत्तर द्यायला हवे, ही सर्वच भारतीयांची कित्येक दशकांपासून इच्छा होती.

‘पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या’ अशी मागणी करून देशवासियांचा घसा सुकला होता, तर असे उत्तर देऊ असे आश्वासन देणाऱ्या नेत्यांच्या कित्येक पिढ्या गेल्या. मात्र परिस्थिती जैसे थे होती. कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे पाकिस्तान सुधारला नाही आणि सुधारणारही नाही. त्याला अद्दल शिकविणे ही ऐतिहासिक गरज होती आणि आज तो क्षण देशवासियांना अनुभवायला मिळाला. हवाई दलाचे आणि सरकारचे त्यानिमित्त हार्दिक अभिनंदन!

Leave a Comment