हवाई दलाच्या कारवाईनंतर शाहबाज शरीफची दर्पोक्ती; राजधानी दिल्लीत पाकिस्तानी झेंडा फडकणार

shahbaaz-sharif
नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी पहाटे बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा या हल्ल्यात झाल्याचे सांगितले जाते. त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा तळ या हल्ल्यात नष्ट करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर तीळपापड झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

पाकिस्तानी जियो या वृत्त वाहिनीशी बोलताना पाकिस्तानी झेंडा आता दिल्लीत फडकेल, असे शाहबाज शरीफने म्हटले. याचदरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताने हवाई सीमेचे उल्लंघन केले असून इस्लामाबादला उत्तर देण्याचा अधिकार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले. दरम्यान, भारतीय वायूसेनेच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

भारतीय लष्कर पीओकेतील दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानी सीमेवर सतर्क झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या वतीने नियंत्रण रेषेपासून ते आंतरराष्ट्रीय सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हल्ल्यानंतर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Leave a Comment