पुलवामा – हल्ला सरला, कवित्व पुन्हा सुरू

pulwama
काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर झालेल्या हल्ल्यात 40 च्या वर जवान हुतात्मा झाले. त्यानंतर देशभरात सहानुभूती, संताप आणि देशप्रेमाची लाट उसळली. या जवानांबद्दल सर्व थरांतून शोक संदेश येऊ लागले. त्यावेळी राजकारणाला काहीसे शहाणपणाचे वळण आले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपले नेहमीचे वैर बाजूला ठेवून देशासाठी एक होण्याचे सूतोवाच केले. मात्र नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे तो समंजसपणा मागे पडला आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता तर या हल्ल्यावरूनच दोन्ही गटांमध्ये कवित्व रंगले आहे.

निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षात राजकीय युद्ध सुरू होणार हे स्वाभाविकच होते. त्या प्रमाणे झालेही. विरोधी नेत्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. सीआरपीएफच्या जवानांना शहीदांचा दर्जा का देण्यात आला नाही, यावरून विशेषतः काँग्रेसने टीकेची संततधार सुरू केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसवर घराणेशाहीचा (पुन्हा) आरोप केला आहे. गांधी-नेहरू कुटुंबीयांनी देशापेक्षा स्वतःला जास्त महत्त्व दिल्याची टीका त्यांनी केली. प्रत्यक्ष प्रचार सुरू होईल आणि प्रचाराला वेग येईल तेव्हा या टिकेला आणखी धार येईल, हे नक्की.

सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. पंतप्रधानांनी या प्रसंगाचा फायदा करून घेतला नसता तरच नवल. “हेच लोक भारतात राफेल विमान येऊ नयेत यासाठी जोराचे प्रयत्न करत आहेत. बोफोर्सपासून हेलिकॉप्टर व्यवहारापर्यंत सर्व तपास एका कुटुंबाकडे निर्देश करतात,” असे ते म्हणाले. शाळेपासून रुग्णालयापर्यंत, महामार्गांपासून विमानतळा पर्यंत आणि स्टेडियमपासून पुरस्कारापर्यंत एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे आढळतात. या कोड्याचे उत्तर ज्यांच्याकडे आहे ते लोक भारत प्रथम असे नव्हे तर कुटुंब प्रथम यावर विश्वास ठेवतात, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी हा हल्ला चढवत असतानाच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांच्यावर तोफ डागली. निमलष्करी दलांच्या जवानांच्या त्यागाला मान्यता देऊन त्यांना शहीदांचा दर्जा द्यायला हवा, असे काँग्रेसने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर असे करण्यामागे मोदी यांचा अहंकार येत असल्याचीही टीका पक्षाकडून करण्यात आली.

“माझ्या विनंतीवरून कृती करण्यामध्ये पंतप्रधानांचा अहंकार येत असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ते कृती करतील, अशी मला आशा आहे,” असे गांधी यांनी ट्विट केले. पुलवामावरील हल्ला हा देशावरील हल्ला असून या हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी सरकारने उचललेल्या कोणत्याही पावलाला आपला पाठिंबा असेल, हे जाहीर करणारे राहुल हेच का असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे वेळापत्रक मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात येील, असे संकेत निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिले आहेत. तेव्हापासून प्रमुख राजकीय नेत्यांमधील राजकीय धुळवडीला आणखी वेग आला आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर लष्करी जवान आणि सैनिकांबद्दल तीव्र जनभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने आपण असल्याची अहमहमिका नेत्यांमध्ये लागली आहे. आणि काँग्रेस व भाजपशिवाय अन्य पक्षांचे नेतेही यात मागे नाहीत.

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशात युद्धोन्माद निर्माण करू पाहत आहे आणि जवानांच्या मृतदेहांवरून राजकारण’ खेळण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी खरमरीत टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या कोर कमेटीच्या बैठकीला संबोधित करताना केली.

ज्येष्ठ मार्क्सवादी नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला. “अनेक कॅमेऱ्यांतून प्रसिद्धीचे फोटो शूट करून पंतप्रधानांनी केवळ ऐतिहासिक अन्यायांना बळी पडलेल्यांच्या जखमांवर मीठ चोळले,” असे त्यांनी म्हटले आहे.

थोडक्यात म्हणजे सर्व राजकीय पक्षांना आपण लष्कराचे हितचिंतक असल्याचे भासवायचे आहे. त्यासाठी अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा वापर करण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे पुलवामातील हल्ल्यानंतर आलेली संयत प्रतिक्रिया आणि सहकार्याची भूमिका दिखावा होती की काय, अशीही शंका यायला वाव आहे. तीन-चारदा युद्धात हरूनही पाकिस्तानला भारतावर वारंवार दहशतवादी हल्ले करण्याचे धैर्य का होते, या प्रश्नाचेही उत्तर कदाचित त्या शंकेतच असावे!

Leave a Comment