दोन अध्यक्षांचा दादला बनलेला देश – व्हेनेझुएला

Venezuela
“लॅटिन अमेरिका ही गालिच्यावर बसलेल्या समजदार कुत्र्यासारखी आहे. त्याला फक्त व्हेनेझुएलाचा अपवाद आहे आणि तो देश म्हणजे एक मोठी समस्या आहे,” असे वक्तव्य पेरूचे अध्यक्ष पेड्रो पाब्लो कुच्झिन्स्की यांनी दोन वर्षांपूर्वी केले होते. कुच्झिन्स्की हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावेळी ते वक्तव्य कितपत खरे होते माहीत नाही, परंतु आज ती गोष्ट एकदम खरी ठरली आहे.

व्हेनेझुएला हा देशच असा आहे, की त्याचे नाव नेहमी चर्चेत असते, पण त्याची कामगिरी सहसा नजरेस पडत नाही. पृथ्वीच्या गोलावर हा देश दक्षिण अमेरिका खंडात येतो. सध्या या देशाची स्थिती अत्यंत विचित्र बनली आहे कारण या देशात दोन अध्यक्ष आहेत. एका अध्यक्षाला अमेरिकेची मान्यता आहे, तर दुसऱ्याला देशातील लोकांची. निकोलस मादुरो आणि युआन गेईडो अशा या दोन अध्यक्षांच्या जात्यामध्ये जनता मात्र भरडून निघत आहे. दोन बायकांचा दादला बनलेल्या नवऱ्यासारखी व्हेनेझुएलाच्या लोकांची अवस्था झाली आहे.

व्हेनेझुएला हा तसा निसर्गसंपन्न देश. त्याच्याकडे पेट्रोलियमचा एवढा मोठा साठा आहे, की संपूर्ण देशाची पेट्रोलची मागणी तो पूर्ण करू शकतो. अॅमेझॉनची जंगलेसुद्धा याच देशात आहे. मात्र या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्यासाठी हवी असलेली राजकीय शांतता मात्र या देशाकडे नाही. लोकांकडे खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे व्हेनेझुएलात पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. त्यात जगातील सर्वात उंच धबधब्यापैकी असलेला अँजेल धबधबा याच देशात आहे, हा आणखी एक विरोधाभास. गुईडो आणि मादुरो यांच्या सत्तास्पर्धेत अर्थव्यवस्था कोलमडली आहे. युआन गुईडो हे तुलनेने तरुण आहेत आणि त्यांना व्हेनेझुएलाच्या जनतेची साथ आहे. निकोलस मादुरोंना रशियाचा पाठिंबा आहे. तेथील लोकांना सध्या अत्यंत हाल-अपेष्टांतून जावे लागत आहे, कारण देशात चलनवाढीचा दर भयंकर झाला आहे. जगात अशी वाईट स्थिती क्वचितच कोण्या देशाची असावी. अगदी एक कप कॉफीसाठीही एक लाख बोलिव्हरपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात.

भाजी मंडईत भाजी मांडावी तसे लोक पोत्यांमध्ये चलनी नोटा भरून बसतात. चलनवाढीचा दर एवढा आहे, की 20,000 बोलिवर या सर्वात मोठ्या नोटेचा अनधिकृत बाजारातील दर फक्त सहा डॉलर एवढा आहे. परिस्थिती एवढी वाईट आहे, की गेल्या सुमारे दशकवर्षात कुपोषणामुळे या देशातील नागरिकांचे सरासरी वजन साडे आठ किलोने घटले आहे. सत्तेवर दोन अध्यक्ष असले तरी लोकांना दोन वेळचे भरपेट जेवण मिळत नाही. त्याचमुळे गुन्ह्यांचा दर भयंकर वेगाने वाढला आहे. तेथील सरकारनेच दिलेल्या आकडेवारीनुसार, 2015 मध्ये प्रत्येक 21 मिनिटाला एक खून होत होता. दुसरीकडे, याच देशांतून सहा युवती मिस युनिव्हर्स आणि पाच महिला मिस वर्ल्ड बनल्या आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढलेली असल्यामुळे पोलिसांची संख्याही साहजिकच वाढवावी लागली आहे. देशाचे काही भाग तर जणू कायमस्वरूपी लष्करी छावणीत रूपांतरित झाले आहेत.

या दुरवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक स्थलांतर करत आहेत. व्हेनेझुएलाच्या लोकांची ही दुरवस्था पाहून जागतिक समुदायाने मदत करण्यासाठी पावले उचलली. तर त्यालाही तेथील नेतृत्वाने खोडा घातला आहे. व्हेनेझुएलाला परकीय मदत पुरवण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने मदत मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या मदत सामग्रीला अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या निष्ठावान सैनिकांनी सीमेवरच थांबवून ठेवले आहे. तेथे सैनिक आणि निदर्शकांमध्ये चकमकी उडाल्या आहेत. त्यात दोन जण ठार झाले तर 300 जण जखमी झाले. या मदतीच्या निमित्ताने आपल्याला सत्तेवरून हाकलून काढण्याचा कट आखला जात आहे, असा संशय मादुरो यांना आहे.

बोगोटा येथे सोमवारी लॅटिन अमेरिकन देशांच्या सरकारांची एक तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मादुरो हे हुकूमशहा असून त्यांच्या हुकूमशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी गुईडो यांनी सैनिकांना आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला सुमारे 60 हून अधिक सैनिकांनी प्रतिसाद दिला आहे, असे कोलंबियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जगाची एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या शेजारी असलेल्या या देशाची ही अवस्था पाहून कोणालाही किव येणे साहजिक आहे. वटवृक्षाच्या छायेखाली झाडे वाढत नाहीत, तसेच काहीसे या देशाचे झाले आहे.

Leave a Comment