अजित डोवाल एरियल स्ट्राईकचे खरे ‘सुत्रधार’

ajit-doval
भारतीय हवाईदलाची 12 मिराज 2000 विमाने आज पहाटे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून बालाकोटमध्ये जाऊन 1000 किलोचे बॉम्ब टाकून, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करून शान से माघारी आली. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानवर एरियल स्ट्राइक करून त्यांनी पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला आहे. 250 ते 300 दहशतवाद्यांचा या कारवाईत खात्मा झाल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मोहिमेत भारतीय सैन्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. तसेच, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही या मोहिमेत महत्वाची भूमिका असल्याचे समजते.

भारतीय लष्कराचे या कामगिरीबद्दल कौतुक होत असतानाच अजित डोवाल यांचेही सोशल मीडियावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. भारताने यापूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर आज बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 ची 12 लढाऊ विमाने घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. मोदी त्यावेळी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचे या संपूर्ण मोहिमेवर लक्ष होते.

या हल्ल्यासंदर्भातील बैठका आणि योजनेत मोदींचे खास आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोवाल हेही सहभागी असल्याचे समजत असल्यामुळेच या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, पतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोवाल यांचेही कौतुक केले जात आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर एनएसए अजित डोवाल यांनी भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि भारतीय वायू सेनेचे प्रमुख बीएस धनोआ यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच देशाच्या सीमा भागातील सुरक्षेसंदर्भात आढावाही घेतला आहे.

Leave a Comment