रॉबर्ट वाड्रा लोकसभा रिंगणात उतरणार?

robert
कॉंग्रेस पक्षाच्या उत्तरप्रदेश महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारून प्रथमच सक्रीय राजकारणात उतरलेल्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शहरात रॉबर्ट यांची पोस्टर्स अगोदरच झळकली आहेत. त्यात रॉबर्ट यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती आणि मतदारसंघात स्वागत असा मजकूर आहे.

रॉबर्ट वाड्रा यांची मनी लाँड्रींग प्रकरणात सध्या इडी विभागाकडून चौकशी सुरु आहे. रॉबर्ट यांनी चौकशीतून मुक्तता झाली आणि माझ्यावरचे आरोप चुकीचे असल्याचे शाबित झाले कि सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार असल्याचे फेसबुक वर नुकतेच पोस्ट केले होते. प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याची घाई नाही असेही ते म्हणाले आहेत. मात्र त्यांनी उत्तरप्रदेशविषयी विशेष प्रेम असल्याचे आणि येथील लोकांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे सांगून राजकारण प्रवेश होऊ शकतो असे सूचित केल्याचे मानले जात आहे.

रॉबर्ट वाड्रा मुळचे मुरादाबाद येथील असून त्यांचा जन्म येथेच झाला आहे. ते म्हणतात, जनमानसात माझी प्रतिमा जाणून बुजून खराब केली जात आहे. त्यातून मी खूप शिकतोय. त्यामुळे उत्तर प्रदेशातील लोकांसाठी काही काम करण्याची इच्छा आहे. माझा हा छोटा प्रयत्न मोठा बदल घडवून आणेल असा विश्वास वाटतो.

Leave a Comment