नादान म्हणा, पण देशद्रोही नका म्हणू…!

sachin-tendulkar
तुम्ही जर क्रिकेट रसिका किंवा राजकीय कार्यकर्ते असाल तर 28 ऑक्टोबर 1991 हा दिवस तुम्हाला निश्चितच आठवत असेल. याच दिवशी मुंबईत वानखेडे मैदानावर भारत-पाकिस्तान सामना आय़ोजित करण्यात आला होता. शिवसेनेने या सामन्याला विरोध करण्याची घोषणा केली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत न होऊ देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 15-20 शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियममध्ये घुसून खेळपट्टीवर कुदळी चालवल्या आणि तेल ओतले. शेवटी तो दौराच रद्द करण्याचे पाकिस्तानने ठरविले.
भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान क्रिकेट सामना हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. पाकिस्तानशी सामने खेळावेत का नाही आणि खेळात राजकारण आणावे का नाही, या मुद्द्यांवरून दोन गट पडलेले असतात. खासकरून शिवसेनेचा या सामन्यांना कायम विरोध राहिला आहे. हा विरोध 1991 प्रमाणे टोकाच्या पातळीवरही गेला आहे. हा विरोध असल्यामुळेच की काय, या दोन देशांच्या सामन्याला आगळी धार येते. आता मात्र खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच या वादात सापडला आहे. त्यावरून त्याला देशद्रोही ठरविण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. मात्र याबाबतची वस्तुस्थिती शांत डोक्याने समजून घेण्याची गरज आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याला असलेल्या विरोधाला परत धार आली आहे. या हल्ल्यात 40 सैनिक ठार झाले. त्या पार्श्वभूमीवर येत्या जून महिन्यात विश्वचषक स्पर्धेत हा सामना होणार आहे. मात्र हा सामना म्हणजे पुलवामातील हुतात्मा सैनिकांचा अवमान आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, यावर सर्वच राष्ट्रभक्त नागरिकांचे एकमत आहे. देशप्रेमाची तीव्र भावनाच त्यातून प्रकट होते.
मात्र सर्वसामान्य जनता आणि क्रिकेटपटू यांची भूमिका या बाबतीत वेगळी असू शकते. भारताने आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सामना खेळला नाही तर समोरच्या संघाला विनाकारण दोन गुण मिळतील. पाकिस्तानला हा फायदा करून देता कामा नये, असे सचिनने म्हटले होते. सुनील गावसकर तसेच अन्य काही खेळाडूंचेही हेच म्हणणे होते. एक प्रकारे त्यांची ही भूमिका राष्ट्रप्रेमाचीच होती. भारताने पाकिस्तानला मैदानावर हरविलेले मला आवडेल, असे गावसकर यांनी म्हटले होते.
विशेष म्हणजे काही खेळाडूंनी हा सामना खेळू नये, अशीही भूमिका मांडली होती. यात मोहम्मद कैफ आणि सौरव गांगुली यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश होता. पाकिस्तानबरोबर सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांवर बहिष्कार घालावा, असे गांगुलीने म्हटले होते. तिसरीकडे कपिल देव यांच्यासारखे ज्येष्ठ खेळाडू आहेत. त्यांनी सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली होती.
यावरूनच काही जणांनी वादळ उभे केले आणि सचिन तेंडुलकर देशद्रोही असल्याची हाकाटी सुरू केली. सचिनचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळेस आले हे खरेच, मात्र तेवढ्यावरून त्याला थेट देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल न्यावी, हे काही बरे नाही. तबल्ल दोन दशके ज्या खेळाडूने देशाचे प्रतिनिधित्व केले, देशाच्या क्रिकेटला एक उंची मिळवून दिली त्याला एवढ्या कारणावरून थेट सुळावर देणे म्हणजे शुद्ध आततायीपणा होय. राजकारणाचे आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे छक्के-पंजे न समजणाऱअया सचिनच्या वक्तव्यात नादानपणा असेलही, परंतु देशद्रोह?
काही माध्यमे आणि वाहिन्यांचे तर एवढ्यावर समाधान झाले नाही. त्यांनी सौरव आणि सचिन यांच्यातच कलगीतुरा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने खुद्द सौरवनेच हे प्रयत्न हाणून पाडले. “मीडियामधील बरेच लोक माझे वक्तव्य सचिनच्या विरोधात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा मी म्हणालो, की मला विश्वचषक हवा आहे तेव्हा माझ्या वक्तव्याचा त्याच्या निवेदनाशी काहीही संबंध नव्हता. मी त्याचा निषेधही केला नाही. तो गेल्या 25 वर्षांपासून माझ्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे,” असे सौरवने म्हटले आहे.
सचिननेही त्याला तेवढ्याच दिलदारीने उत्तर दिले आहे. “यावर तू कोणतेही स्पष्टीकरण देरण्याची गरज नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला देशाच्या भल्याचीच काळजी आहे,” असे सचिनने ट्विटरवर लिहिले. या दोन खेळाडूंच्या या स्पष्टीकरणामुळे हा वाद पेल्यातील एक वादळ ठरावा, हीच अपेक्षा.
आणि ज्यांना पाकिस्तानशी सगळेच संबंध तोडायचे, पाकिस्तानला शिव्या देणे हीच ज्यांची देशभक्ती त्यांच्यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली टिप्पणी मार्मिक आहे. “या लोकांना पाकिस्तानशी सामना खेळावा असे म्हणणारा सचिन देशद्रोही वाटतो, परंतु आपल्या स्टुडिओत चर्चेसाठी पाकिस्तानी तज्ञांना आणि अधिकाऱ्यांना बोलावताना काही वाटत नाही,” असे ट्वीट त्यांनी केले. यातच सर्व काही आले.

Leave a Comment