मनसे तर गुंड प्रवृत्तीच्या आणि घटनेवर विश्वास नसलेल्या लोकांचा पक्ष – संजय निरुपम

sanjay-nirupam
मुंबई – सध्याच्या घडीला आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष जुंपलेले असतानाच मोदी विरोधी लाट तयार करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीत राज ठाकरे यांच्या मनसेचा प्रवेश यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आघाडीत मनसेच्या प्रवेशावर वक्तव्य केले आहे. याबाबत ते म्हणाले, आमची आणि मनसेची विचारधारा वेगवेगळी असून समविचारी पक्षांसोबत आघाडी करायची असते. मनसे तर गुंड प्रवृत्तीच्या आणि घटनेवर विश्वास नसलेल्या लोकांचा पक्ष असल्यामुळे ते ते भाषा आणि प्रांतवादाचे राजकारण करतात.

त्याबरोबर यावेळी त्यांना राष्ट्रवादीने जर आपल्या कोट्यातील जागा मनसेसाठी सोडल्या तर काँग्रेस काय करेल? असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसवर पूर्ण विश्वास आहे. ते आमचा विश्वासघात कधीच करणार नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते की निरुपम यांच्या कडक विरोधामुळेच काँग्रेस मनसेला नाकारत आहे. पण मनसेला सोबत घेतल्याशिवाय मुंबईत आघाडीला बळ मिळणार नाही, असे राष्ट्रवादीचे मत आहे.

काँग्रेसने प्रस्ताव धुडकवल्यानंतरही राष्ट्रवादी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. मनसेला आघाडीत घेणे फायदेशीर असल्याचे आम्हाला वाटते. त्यांना सोबत घ्यायला हवे. काँग्रेसला नेमकी काय अडचण आहे ती आम्ही समजून घेऊन आणि त्यांच्यासोबत या विषयावर पुन्हा चर्चा करू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment