साताऱ्यातील भाजपच्या संभाव्य उमेदवाराच्या भेटीला शिवेंद्रराजे

BJP
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला आता जोर येत आहे. त्यातच उदयनराजे भोसले यांचा गड असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघात भाजप नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची शक्यता वृत्त काल सगळीकडे झळकले होते. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचे सातारा लोकसभेचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची भेट घेतली आहे.

साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये शिवेंद्रराजे आणि भाजपचे नरेंद्र पाटील यांची भेट झाली. शिवेंद्रराजे आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवाराला भेटून शिवेंद्रराजे हे उदयनराजेंना धक्का देण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत की काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

दरम्यान, साताऱ्यातील या दोन राजेंमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. पण त्यानंतर आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हणत शिवेंद्रराजेंनी आपण अजूनही उदयनराजेंवर नाराज असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील भेटीने उदयनराजेंच्या अडचणी वाढतात का, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, भाजप युतीच्या घोषणेनंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता असल्यामुळे येथे उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Leave a Comment