बीएसएनएल, एमटीएनएल साठी सर्वात मोठी व्हीआरएस योजना

mtnl
व्हीआरएसच्या जागतिक इतिहासात सर्वात मोठी ठरेल अशी ऐच्छीक सेवानिवृत्ती योजना सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांसाठी आखली असून यात १ लाख कर्मचारी सामील केले जातील असे समजते. त्यासाठी सरकारने ८५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून जादा वयाच्या कर्मचाऱ्यांना ऐच्छीक सेवानिवृत्ती देऊन या दोन्ही दूरसंचार कंपन्यात नवीन प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे समजते.

या निवृत्ती योजनेचा सरकारी खजिन्यावर मोठा ताण पडणार आहे तरीही ही योजना आवश्यक आहे असे सांगितले जात आहे. या दोन्ही कंपन्या नुकसानीत आहेत आणि महसुलाच मोठा भाग कर्मचारी वेतनावर खर्च होत आहे. बीएसएनएल ऐच्छीक सेवानिवृत्ती योजनेसाठी ६३६५ कोटी तर एमटीएनएल ऐच्छीक सेवानिवृत्ती योजनेसाठी २१२० कोटींची तरतूद करावी लागणर असून त्यासाठी १० वर्ष मुदतीचे सरकारी बाँड जारी केले जातील. तसेच कंपन्यांकडे असलेले सध्याचे भूखंड गहाण ठेऊन तो पैसा ४ जी स्पेक्ट्रम खरेदीसाठी वापरला जाईल असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार बीएसएनएलमध्ये सध्या १.७६ लाख कर्मचारी असून कंपनीवर १४ हजार कोटींचे कर्ज आहे. कंपनीला ३१२८७ कोटींचे नुकसान झाले आहे आणि महसुलातील ६० टक्के रक्कम वेतनावर खर्च होत आहे. त्यामुळे ७५ हजार कर्मचार्यांसाठी ऐच्छीक सेवानिवृत्ती योजना राबविली जाणार आहे. एमटीएनएल मध्ये २२ हजार कर्मचारी असून १९ हजार कोटी कर्ज आहे. या कंपनीच्या महसुलातील ९० टक्के रक्कम वेतनावर खर्च होत आहे. त्यामुळे १६ हजार कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छीक सेवानिवृत्ती योजना राबविली जाणार आहे.

Leave a Comment