शिवाजी पार्कवरील राहुल गांधींच्या होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली

rahul-gandhi
मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्कवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या होणाऱ्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. 1 मार्च रोजी राहुल गांधी यांच्या होणाऱ्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज फेटाळला आहे. आता एमएमआरडीए मैदानावर ही सभा होणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

दरम्यान काँग्रेसने शिवसेना, मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडीला मैदान मिळते पण राहुल गांधींसाठी सरकार परवानगी देत नसल्याचा आरोप केला आहे . गुजरातमधील कार्यकारणीसाठी राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. ते त्यानंतर महाराष्ट्रात येणार आहेत. 1 मार्च रोजी त्यांची धुळे आणि मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतील सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची जागा काँग्रेसकडून निश्चित करण्यात आली होती. मात्र याची परवानगी काँग्रेसला मिळालेली नाही. सगळ्यांना शिवाजी पार्क सभेसाठी मिळत, मग आम्हाला का मिळत नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान मनसेला महाआघाडीत घ्यायला काँग्रेसने स्पष्ट नकार कळवला असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे. मनसेला महाआघाडीत घ्यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी प्रस्ताव ठेवला होता. पण मनसे बरोबर वैचारिक मतभेद आहेत. समविचारी पक्षांची आघाडी असावी असा महाआघाडीचा उद्देश आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत स्थान नाही असे काँग्रेसने स्पष्टपणे राष्ट्रवादीला कळवले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment