आता कुत्र्यांच्याही डीएनए चाचणीचे फॅड

DNA
आरोग्य समस्या आणि कौटुंबिक इतिहासाबद्दल माहिती घेण्यासाठी डीएनए चाचणी करणे ही आता सर्रास गोष्ट झाली आहे. मात्र पाळीव कुत्र्यांची डीएनए चाचणी? होय, हे खरे आहे. श्रीमंती ओसंडून वाहत असलेल्या अमेरिकेत अधिकाधिक नागरिक पाळीव कुत्र्यांची डीएनए चाचणी करत आहेत. गेल्या काही वर्षांत कुत्र्यांकरिता अनुवांशिक चाचणीचे प्रमाण वाढले आहे.

खास कुत्र्यांच्या डीएनए चाचण्या करून देणाऱ्या अनेक कंपन्या घरपोच सेवा देतात आणि या चाचण्या माणसांवर करण्यात येणाऱ्या चाचण्यांसारख्याच असतात. एखाद्या प्राण्याच्या अनुवांशिक इतिहासावर या चाचण्यांतून प्रकाश पडतो.

या चाचणीसाठी फार काही लागत नाहीपूर्वी त्यासाठी कुत्र्याचे रक्त काढावे लागायचे. मात्र 2009 मध्ये तोंडातील लाळेचा नमुना घेण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आणि या चाचण्यांसाठी पशु डॉक्टरांची मदत घेण्याची गरज संपली. कुत्र्याच्या तोंडातून गोळा केलेला अगदी किंचित नमुना त्यासाठी पुरेसा असतो.

गेल्या 10 वर्षांत 10 लाखांपेक्षा जास्त कुत्र्यांवर अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्याचे अधिकृत आकडेवारी सांगते. अनेक कुत्र्यांच्या मालकांना डीएनए चाचण्या या त्यांच्या लाडक्या पाळीव प्राण्याबद्दल जास्त माहिती मिळण्याचा एक उत्तम मार्ग ठरतो. मात्र या वाढत्या प्रमाणामुळेच त्यांची क्षमता आणि मर्यादांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने न्यूयॉर्कच्या लिसा टॉपोल या महिलेशी चर्चा केली. लिसा यांच्याकडे दोन कुत्री आहेत: प्लोप आणि श्मुत्जी. यावर्षी झालेल्या वेस्टमिन्स्टर केनेल क्लब डॉग शोमध्ये या दोन्ही कुत्र्यांनी भाग घेतला होता. ही दोन्ही कुत्री मिक्स्ड ब्रीड म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांची अपत्ये आहेत. त्यांची अनुवांशिक चाचणी नुकतीच लिसा यांनी करून घेतली. त्यामुळे कोड्याचे काही तुकडे एकत्र करता आले. त्यामुळे त्यांना जास्त समजून घेता आले, असे त्यांनी सांगितले.

कुत्र्यांच्या चाचणीची सुरूवात होऊन 20 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. पूर्वी या चाचण्या बहुतेकदा वैद्यकीय उपचारांसाठी आणि इतर हेतूंसाठी करण्यात येत असे. मात्र शास्त्रज्ञांनी 2005 मध्ये कुत्र्यांच्या जनुकांच्या एका संपूर्ण संचाची मॅपिंग केली आणि त्यानंतर हा उद्योग झपाट्याने वाढला. विझडम हेल्थ या कंपनीने 2007 मध्ये कुत्र्यांची प्रजात ओळखण्यासाठी एक चाचणी सुरू केली. त्यात काही वर्षांनंतर कंपनीने आरोग्य तपासणीची भर घातली. आजच्या घडीला संपूर्ण जगभरात 11 लाख कुत्र्यांची चाचणी केल्याचा या कंपनीचा दावा आहे.

वेगवेगळे उपयोग
या चाचण्यांमुळे कुत्र्यांवरील संशोधनाचे नवे दालन उघडले आहे. तसेच यामुळे प्राणी संरक्षण संघटनांनाही साहाय्य होते. कुत्र्यांच्या संभाव्य मालकांना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्या या चाचण्यांचा वापर करू शकतात. तसेच एखाद्या कुत्र्याचा वंश एकाच प्रजातीचा आहे हे सिद्ध करण्यासाठीही डीएनए चाचणीचा वापर केला जाऊ शकतो. कुत्र्यांची पैदास करणाऱ्यांना त्यामुळे मदत होऊ शकते तसेच कुत्र्यांचे काही सामान्य आजार दूर करण्यासही त्यामुळे मदत होऊ शकते. गंमत म्हणजे जे मालक आपल्या पाळीव कुत्र्यांची विष्ठा रस्त्यावरून उचलत नाहीत, त्यांची ओळख पटविण्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. कुत्र्यांनी चावा घेण्याच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठीही या चाचणीचा वापर केला जातो.

अशाच एका प्रकरणात एका बेल्जियन मालनोईस कुत्र्याने पोमेरॅनियन कुत्र्याला मारल्याचा आरोप चुकीचा असल्याचे आणि तो कुत्रा निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यात यश आले होते.

कुत्र्यांची डीएनए चाचणी केल्याने त्यांच्यावर उपचार करणे सोपे होते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्व मालकांनी आपल्या तरुण कुत्र्यांची तपासणी करून घ्यावी, असे एर्नी वॉर्ड या पशुवैद्यक डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मात्र प्राणी तज्ञ वॉर्ड यांच्याशी सहमत नाहीत. बोस्टनमधील एक पशुवैद्य आणि दोन शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी नेचर या नियतकालिकात टिप्पण्या लिहिल्या होत्या. “पाळीव प्राण्यांच्या अनुवंशशास्त्रावर बंधन करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले होते. या टिप्पणीच्या सुरूवातीला त्यांनी एक घटना सांगितली होती. एका मालकीणीला या चाचणीतून असे समजले, की तिच्या मादी पिलाला एक दुर्मिळ मेंदू विकार होता आणि कालांतराने तो आणखी दुर्धर झाला असता. ही माहिती मिळाल्यावर तिने या कुत्रीचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. लिसा मोसेस यांनी ती समीक्षा लिहिण्यास मदत केली होती. त्या मादी पिलाचा आजार बरा करण्याजोगा असता, असे त्यांनी म्हटले होते.

जेनेटिक टेस्टिंग फॉर डॉग्स ही संस्था कुत्र्यांच्या डीएनए चाचण्यांमध्ये व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. “या अनुवांशिक चाचणी करणारे कोण आहेत? यात कोणतेही प्रमाण नाहीत. नियम नाहीत. स्वतंत्र नियामक संस्था नाही. पशु डॉक्टर हे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत तर ग्राहक मात्र पुढे सरसावून चाचण्या करत आहेत,” असे या संस्थेच्या प्रकल्प संचालक लेवेलिन-जैदी यांनी दि अटलांटिक संकेतस्थळाला गेल्या वर्षी सांगितले होते.
ते काहीही असले तरी कुत्र्यांच्या मालकांमध्ये या चाचण्या लोकप्रिय होत आहेत. अनेक मालक या चाचण्यांचे निकाल हातात घेऊनच पशु डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो म्हणतात तसे प्रत्येक कुत्र्याची डीएनए चाचणी होण्याचीही म्हण येईल. तो दिवस दूर नाही!

Leave a Comment