कार उत्पादकांसाठी भारत बनणार पुढील चीन?

car
चीनमध्ये कारची विक्री मोठ्या प्रमाणात कमी होत असून वाहन उत्पादक कंपन्या नवीन बाजारपेठांचा शोध आत आहेत. भारताची वाढती आर्थिक शकतात आणि लोकसंख्येचा आकार यामुळे चीनला पर्याय म्हणून भारताची बाजारपेठ आहे. त्यामुळे चीनची जागा भारत घेऊ शकतो मात्र त्यात काही अडचणी आहेत, असे आश्वासक मत जागतिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

गेल्या दशकभरापासून चीन ही कारची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. एकट्या 2017 या वर्षात सुमारे दोन कोटी 80 लाख विकण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या वर्षी वाहन विक्रीत 5.8 टक्क्यांची घट होऊन विकल्या गेलेल्या कारची संख्या दोन कोटी 24 लाख एवढ झाली, असे चीनच्या पॅसेंजर कार असोसिएशनने म्हटले होते. गेल्या 20 वर्षांत कारच्या विक्रीमध्ये नोंद झालेली ही पहिली घट होती.

यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रीत 15.8 टक्क्यांची घट झाली असून जानेवारीत 23 लाख 70 हजार कार विकल्या गेल्या, असे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सीएएएम) म्हटले आहे. चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था, ग्राहकांमध्ये खालावलेला आत्मविश्वास आणि व्यापाराच्या वाढत्या तणावामुळे चीनमध्ये कारला मागणी कमी झाली असून चिनी ग्राहकांनी कार खरेदी करणे थांबविले आहे. तसेच सरकारने वैयक्तिक कर्ज देण्यावर घातलेल्या बंदीचाही परिणाम कारच्या विक्रीवर झाला आहे.

अलीकडील काही वर्षांमध्ये जगातील बलाढ्य वाहन उत्पादकांचा चीनच्या विशाल बाजारपेठेवर भर राहिला आहे. जर्मन कंपनी फोक्सव्हॅगन (व्हीडब्लू) पासून ते अमेरिकेच्या जनरल मोटर्सपर्यंत (जीएम) अनेक कंपन्यांचा त्यात समावेश आहे. जागतिक विक्री वाढविण्यासाठी या कंपन्यांना चीच्या बाजारपेठेचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, व्हीडब्लू आपल्या 40 टक्के कार चिनी ग्राहकांना विकते आणि चीन ही जीएमसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

मात्र जगातील या आघाडीच्या ऑटो मार्केटमध्येच मागणी कमी झाल्यामुळे हे वाहन उत्पादक चिंताग्रस्त बनले आहेत. चीनच्या बाजारपेठेचा आकार आणि प्रभाव लक्षात घेता चीन शिंकतो तेव्हा जगातील वाहन उद्योगाला सर्दी होते. त्यात भर म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांपासून ते स्वयंचलित वाहनांपर्यंतचे नवीन तंत्रज्ञान समोर येत असताना या उद्योगापुढे अनेक नवी आव्हाने उभी राहत आहेत. अशा परिस्थितीत चीनमधील हे नुकसान भरून काढण्यासाठी वाहन उत्पादकांसमोर फारसे पर्यायी देश नाहीत.

त्यामुळेच प्रचंड मोठी बाजारपेठ आणि वेगवान आर्थिक वाढ असलेला भारत हा अनेक जणांच्या दृष्टीने नवीन आशास्थान ठरला आहे. भारतीय वाहन उद्योग जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये प्रवासी व व्यावसायिक वाहनांसह देशात एकूण 40 लाख 10 हजार युनिट्सची विक्री झाली. ही 10 टक्क्यांची वाढ होती. जगामध्ये वाहन उत्पादनात भारत सहाव्या क्रमांकावर आहे, तर तीनचाकी वाहन निर्मितीसाठी अव्वल क्रमांकावर आहे. दुचाकी उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक जगात दुसरा लागतो.

भारत 2020 पर्यंत जपानला मागे टाकेल आणि चीन आणि अमेरिकेनंतर जगात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार बाजारपेठ होईल, असा अंदाज आहे. पुढील दशकात भारतात वाहनांच्या बाजारपेठेत सर्वोत्तम वाढ असेल, असे अनेकांचे मत आहे.

भारताचे प्रति व्यक्ति उत्पन्न सुमारे 2,100 डॉलर आहे आणि देशात सध्या प्रति 1,000 व्यक्ती 50 वाहने आहेत. चीनचे प्रति व्यक्ति उत्पन्न सुमारे 7,500 डॉलर आहे मात्र प्रत्येक 1,000 व्यक्ती 200 वाहने आहेत. भारतातील कारची ही कमी संख्या हीच वाढीची हमी आहे. झपाट्याने वाढते शहरीकरण, उत्पन्न आणि श्रम शक्तीतील महिला व युवकांच्या वाढीव सहभागांमुळे कारची मागणी वाढेल, असे उद्योगातील तज्ञांचे म्हणणे आहे.

मात्र यात काही अडचणी आहेत. भारतीय बाजारपेठेची क्षमता भरपूर असली तरी ती चीनपेक्षा खूपच लहान आहे तसेच वैयक्तिक वाहतुकीसाठी मोटरसायकलचा अधिक वापर होण्याची शक्यता आहे, असे मॅक्वारी ग्रुप या कंपनीतील एशियन वाहन उद्योग संशोधनाच्या प्रमुख जॅनेट लेविस यांनी डॉईशे वेलेला सांगितले. भारतातील मोठ्या शहरांमध्ये स्वतःची कार वापरण्यापेक्षा उबेर किंवा ओला यांसारख्या सेवा वापरण्याकडे लोकांचा कल आहे. तसेच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत असल्यामुळे भारतीयांच्या कार खरेदी करण्याच्या प्रवृत्तीवर मर्यादा येतील, असे त्या म्हणतात. या अडचणींवर मार्ग काढता आला किंवा त्यात काही नवे वळण आले तर मात्र भारत हे स्थान पटकावू शकतो. तेवढी क्षमता आपल्याकडे नक्कीच आहे!

Leave a Comment