केरळमध्ये पुन्हा रक्तरंजित राजकारण

kerala
भारतातील सर्वात सुशिक्षित राज्य म्हणून केरळची ओळख आहे. देवाची भूमी असे केरळीय जनता आपल्या राज्याचे वर्णन करते. मात्र याच निसर्गसुंदर राज्याला एक शाप मिळाला आहे म्हणजे रक्तरंजित राजकारणाचा. अनेक दशकांपासून राजकीय हिंसेने केरळमध्ये मूळ धरले असून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. सर्वच राजकीय पक्ष या हिंसेत सामीलही आहेत आणि या हिंसेला बळीसुद्धा पडत आहेत. गुरुवारी तृशुर येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केरळ साहित्य अकादमीच्या कार्यालयाबाहेर एक आंदोलन केले. त्यावेळी ही बाब प्रकर्षाने समोर आली.

काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांचा नुकताच कासारगोड जिल्ह्यात खून करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. केरळ साहित्य अकादमी ही सरकारी संस्था असून सत्ताधारी डाव्या आघाडीच्या बाजूने असलेल्या साहित्यिकांचा या संस्थेत वरचष्मा आहे. या साहित्यिकांनी या दुहेरी खुनाचा निषेध करावा यासाठी या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. त्यांच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून त्यांनी त्यांना केळीचे खांब भेट दिले.
डावे विचारवंत राजकीय खुनांबाबत बाळगून असतात असा या कार्यकर्त्यांचा आरोप होता. “अंटार्क्टिकामध्ये एखाद्या पेंग्विनचा मृत्यू झाला तर हे लोक भरभरून लिहितात. मात्र या दोन खुनावर यांनी अद्याप मौन पाळले आहे. केरळच्या संस्कृतीसाठी ही शरमेची बाब आहे. मृतांच्या कुटुंबीयांची वेदना या लोकांना दिसत नसेल तर त्यांना एक शब्दही लिहाययचा अधिकार नाही,” असे युवक काँग्रेसचे नेते जॉन डॅनियल म्हणाले.

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एवढे संतप्त होण्याचे कारण म्हणजे मंगळवारी शरत लाल, वय 24 आणि कृपेश, वय 22 या दोन तरुण कार्यकर्त्यांच्या पेरिया या गावात हत्या झाल्या. पीतांबरन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यावर त्यांच्या खुनाचा आरोप आहे. पीतांबरन आणि या दोघांमध्ये एका महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यातून हे हत्याकांड घडले असा आरोप आहे. पोलिसांनी पीतांबरनला अटक केली आहे. परंतु विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे साहित्यिकांच्या विरोधात अशाप्रकारे निदर्शने करण्यास मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी अक्षय घेतला आहे. “केरळ साहित्य अकादमी ही मल्याळी सांस्कृतिक जगताचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. काही समाज विरोधकांनी तिथे जाऊन कलावंतांचा अपमान केला, ही भयानक गोष्ट आहे. कलाकारांनी कशी प्रतिक्रिया द्यावी, हे कोणीही सांगण्याची गरज नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी कन्नूर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे असेच हत्याकांड घडले होते. त्यावेळी माकप आणि संघ कार्यकर्त्यांमधील संघर्षांमुळे केरळमधील राजकीय वैरावर मोठी चर्चा घडली होती. या रक्तरंजित राजकारणामुळे केरळ बरेच कुप्रसिद्ध झाले आहे. राजकीय विचारसरणीमुळे मोठ्या प्रमाणावर हत्याकांड होणारे हे एकमेव राज्य आहे. राजकीय पक्षांनीच हा हिंसाचार जोपासला आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांना संपविण्याच्या उद्देशाने पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना तैनात करण्यात येते.

यापैकी माकप हा सर्वात आघाडीवरचा पक्ष म्हणून समोर आला आहे. हा पक्ष म्हणजे अत्यंत निष्ठावान आणि प्रेरित कार्यकर्त्यांचे एक नेटवर्क आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी हे कार्यकर्ते सदैव सज्ज असतात. खुद्द मुख्यमंत्री विजयन हे एका संघ कार्यकर्त्याच्या हत्येतील एक आरोपी आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) हा सत्तारूढ डाव्या लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे, मात्र भाकपचे कार्यकर्तेही माकपच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरले आहेत, हे विशेष.

भाजप आणि संघ कार्यकर्ते हे माकपचे मुख्य विरोधी आहेत. या दोन पक्षांत 1970 च्या दशकापासून संघर्ष सुरू असून तो आजपर्यंत चालू आहे. डावे जेव्हा सत्तावर येतात हा संघर्ष आणखी उचल खातो, असा साधारण इतिहास आहे. मे 2016 मध्ये डावी लोकशाही आघाडी सत्तेवर आल्यापासून राज्यात किमान दोन डझन राजकीय हत्या झाल्या आहेत. यातील सर्वाधिक हल्ले संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर झाले आहेत. सुरूवातीला भाजप आणि संघाने मवाळ भूमिका घेतली होती, मात्र त्यानंतर संघ कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर देण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे भाजप / संघाच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर माकप गांधीवादी अहिंसेचे पालन करणार नाही, असे पोलिट ब्यूरोचे सदस्य व्ही. एस. अच्युतानंदन यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रात जाहीर केले होते. एकप्रकारे हा कार्यकर्त्यांना मुक्त हिंसा करण्याचा परवानाच होता.

अर्थात माकपची ही हिंसा केवळ भाजप / संघापुरती मर्यादित नाही. काँग्रेस आणि अन्य पक्षांनाही त्याची झळ भोगावी लागली आहे. पोलिसांच्या नोंदींनुसार, राज्यात गेल्या 16 वर्षात राजकीय संघर्षात 300 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आणि त्यापेक्षा दुप्पट लोक जखमी झाले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या सर्व काळ्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर तो आणखी गंभीर होण्याचीही भीती आहे.

Leave a Comment