
दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेतील सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, अशी माहिती देण्यात आल्यामुळे विश्वचषकातील भारत-पाक लढतीत सध्यातरी कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण भारत-पाक सामन्यांचे भविष्य बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्या भुमिकेवर अवलंबून असणार आहे.
ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार विश्वचषक स्पर्धा – आयसीसी
जम्मू काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील सर्वचजण संतप्त झाले आहेत. भारत पाक क्रिकेट संबंधावरही या हल्ल्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात पडले असून दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या विश्वचषकातील लढतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया तसेच भारतातील क्रीडा चाहत्यांकडून आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकविरुध्द खेळू नये, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येणाऱ्या काळात बीसीसीआय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
