युतीवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा टोला

samna
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना-भाजप युतीवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे. सामनात आज तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला असून त्यात युती करण्यामागील कारण सांगण्यात आले आहे. युती झाल्यामुळे विरोधकांच्या डोक्यात वळवळत असलेले किडे साफ चिरडले याच भीतीतून ते वळवळवायला लागले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.

त्याचबरोबर आमच्या तलवारीची धार कायम असून, आमच्याच दिशेने देशातील वारे वळले असल्याचे म्हणत सेनेने अग्रलेखातून भाजपला अप्रत्यक्ष टोला देखील लगावला. स्वकीयांनीच आमच्या पाठीत वार केले आणि हे वारंवार घडले आहे. मात्र, सेनेने पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेल्याचाही उल्लेख केला आहे. मातोश्रीकडे युतीसाठी वाऱ्याची दिशा वळली असल्याचेही सेनेने म्हटले आहे.

भाजप आणि सेनेत तसे वैर नसल्याचे भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने म्हटले आहे. मुळात गेल्या महिनाभरापासून राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे ‘एनडीए’ला ‘कल्हई’ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या एनडीएचे जनकत्व भाजपएवढेच शिवसेना, अकाली दलाकडे असल्याचा उल्लेखही अग्रलेखात केला आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून संघटन पुढे नेले. ही माघार व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले आहे. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नसल्याचे सेनेने म्हटले आहे.

Leave a Comment