हा युद्धोन्माद कशासाठी?

KS-Dhillon
पुलवामातील नृशंस हल्ल्याला 100 तास उलटायच्या आत जम्मू-काश्मीरमधील जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वाचा खात्मा केला आहे, अशी माहिती मंगळवारी लष्कराने दिली. सोमवारी पुलवामामध्येच झालेल्या चकमकींची माहिती प्रसार माध्यमांना देताना 15 व्या कॉर्पचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल के एस ढिल्लाँ यांनी श्रीनगरमध्ये ही माहिती दिली.

पाकिस्तानमध्ये दडून बसलेल्या आणि आयएसआयचा पाठिंबा असलेल्या जैशच्या नेतृत्वाचा केंद्रीय राखीव पोलिस दलावर (सीआरपीएफच्) झालेल्या हल्ल्यामागे हात होता, असे लेफ्टिनेंट जनरल ढिल्लाँ यांनी सांगितले. कामरान या दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला घडवून आणला होता. त्याला संपविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे एक तर हिंसा सोडा किंवा मरणाला तयार राहा, असा निर्वाणीचा इशाराही लेफ्टनंट जनरल ढिल्लाँ यांनी दिला.

पुलवामातील हल्ला भारताच्या अंतःकरणावर झालेला आघात आहे. या हल्ल्याच्या मागे आपण असल्याची कबुली जैश-ए-मुहम्मदने स्वतः दिली होती. जैश-ए-मुहम्मद ही संघटना पाकिस्तानात कार्यरत असल्याचे जगजाहीर आहे. या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानचा जावई असल्यासारखे वागतो. पाकिस्तान सरकारच्या खर्चाने तो रुग्णालयात उपचार (?) घेतो आणि तिथून हल्ल्याचे आदेश देतो. यावरून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट हात असल्याचे सिद्ध होते.

या परिस्थितीत पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आला असता तरच नवल. पाकिस्तानची नांगी ठेचायला हवी, ही जनभावना आहे. त्याबाबत वाद नाही. मात्र त्यासाठी आरडाओरडा करून उपयोग नाही. हे भान देशातील वृत्तवाहिन्यांनी सोडल्याचे दिसते. म्हणूनच युद्ध करा, युद्ध करा असा धोशा त्यांनी सरकारच्या मागे लावला आहे. काही वाहिन्यांनी तर स्वतःच लष्करप्रमुख असल्याच्या थाटात सरकारला सल्ले द्यायला सुरूवात केली.

एका फटक्यात 40 वीर जवांनाचे प्राण घेणाऱ्या या घटनेचा सूड सरकारला घ्यावा लागणारच आहे. तुमच्या मनात जी आग आहे तीच आग माझ्या मनात आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे संकेतही दिले आहेत. खुद्द पाकिस्तानलाही या गोष्टीची जाणीव आहे. म्हणूनच घटनेच्या पाच दिवसांनंतर पाकिस्तानने या हल्ल्याच्या बाबतीत आपले मौन सोडले.

मात्र पाकिस्तानसारख्या शेजारी देशावर कारवाई करण्यासाठी काही एक युद्धनीती आखावी लागते, रणांगणातील बळाबळाचा विचार करावा लागतो, या गोष्टी जणू आपण विसरूनच गेलो आहेत. पी हळद आणि हो गोरी असा काहीसा प्रकार चालू आहे. पुलवामाच नव्हे तर भारताताली कोणत्याही दहशतवादी हल्ल्याशी आमचे काही देणेघेणे नाही, असा पवित्रा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर भारताने हल्ला केल्यास आम्हालाही मजबूरीने त्याला उत्तर द्यावे लागेल, अशी वल्गनाही केली आहे. याचाच अर्थ, अण्वस्त्र सज्ज देश असल्याचा फायदा घेऊन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाला ब्लॅकमेल करत आहे. शिवाय चीनसारख्या देशाचीही त्याला फूस आहे.

हे सर्व विसरून वाहिन्यांवरील वीर सरकारला धारेवर धरत आहेत. आठवडा उलटत आला तरी कारवाई का करत नाही, असा प्रश्न ते विचारत आहेत. याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतलेली भूमिका खूपच समंजसपणाची आहे, असे म्हणावे लागेल. अमरिंदर सिंग यांनी स्वतः पाकिस्तानविरुद्धच्या 1965च्या युद्धात भाग घेतलेला आहे, हे येथे लक्षणीय.

संपूर्ण देश भारतीय जवानांच्या हत्येमुळे संतप्त असून पाकिस्तानविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र ही कारवाई लष्करी, राजनयिक किंवा आर्थिक किंवा या तिन्ही पातळ्यांवर व्हावी, असेही ते म्हणाले. “कोणत्या प्रकारची कारवाई करावी हे केंद्राने ठरवावे, परंतु काही पावले ताबडतोब उचलायला हवीत. लगेच युद्ध करा असे कोणीही म्हणणार नाही, पण जवानांचे हे हत्याकांड काही विनोद नाही. काहीतरी करावे लागेल. मी कंटाळलो आहे, देश कंटाळला आहे,” असे ते म्हणाले.

देश कंटाळला आहे आणि वारंवार होणाऱ्या आघातांमुळे व्यथित झाला आहे, हेही खरे आहे. परंतु म्हणून हा युद्धोन्माद निर्माण करणे हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. शत्रूला संपवायचे असेल तर ते थंड डोक्यानेच संपवावे लागते. अफझलखानाने शिवाजी महाराजांनी बाहेर यावे आणि भावनावश होऊन लढावे म्हणून देवळे फोडली, लोकांवर अत्याचार केले आणि गावेच्या गावी जाळली. परंतु महाराजांनी आपले डोके शांत ठेवले आणि खानाला जाळ्यात ओढून त्याचा परिपात केला. म्हणूनच ते हिंदवी स्वराज्य उभारू शकले. पाकिस्तानवर कारवाई आज नाही उद्या करावीच लागणार आहे. त्यासाठी बोलघेवडेपणा करून शत्रूच्या हातात कोलित द्यायची काही गरज नाही.

Leave a Comment