पुलवामातील शहीदांच्या मदतीसाठी अमेरिकेतील तरुणाने 6 दिवसात जमावले 6 कोटी

america
जम्मू-काश्मिरमधील पुलवामात मागच्या आठवड्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात आपले 40 हून अधिक जवान शहीद झाले. त्यापाठोपाठ एक दिवसानंतर तेथीलच सीमारेषेवर मेजर चित्रेश सिंह स्फोटके निकामी करताना शहीद झाले. त्याचबरोबर 18 फेब्रुवारीला मेजर विभूती शंकर दौंडियाल यांच्यासह 3 जवान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. भारतीय लष्कराने याच बदला घेत पुलवामाचा मास्टरमाईंडचा खात्मा केला. ज्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अवघा देश सरसावला. बिहारच्या शेखपुराच्या डिएम इनायत खान यांनी शहीद जवानाच्या दोन मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या 26 वर्षीय विवेक पटेल याने अवघ्या 6 दिवसात शहीद जवानांच्या कुटुंबियाच्या मदतीसाठी 6 कोटींचा आर्थिक निधी जमा केला आहे.

व्हर्जिनिया येथील एका कंपनीत काम करणाऱ्या विवेक पटेलने आपल्या फेसबुक फ्रेण्डसच्या मदतीने मदतनिधी गोळा करण्यास सुरुवात केली. मोबाइल मेसेजेस, अॅप्लिकेशन्सवरील मेसेजेस आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून त्याने अवघ्या 12 तासांमध्ये 2 लाख 51 हजार डॉलर म्हणजेच 1 कोटीं 79 लाखांहून अधिक रुपयांची मदत गोळा केली.

विवेकच्या फंड रेजरचे त्याचे 5 लाख अमेरिकन डॉलरचे उद्दीष्ट अवघ्या चार दिवसांमध्येच पूर्ण करत चक्क 8 लाख 4 हजार 747 डॉलर एवढा निधी गोळा केला आहे. पाच दिवसांमध्ये या फंड रेझरच्या माध्यमातून पुलवामातील शहीदांसाठी 5 कोटी 75 लाख रुपयांचा निधी गोळा झाला आहे.हळूहळू अनेकांनी विवेकच्या या मोहिमेला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेला पाठिंबा देणारी पोस्ट शिकागोमधील देसी जंक्शन या रेडिओ चॅनेलनेही आपल्या फेसबुकवरुन केली आहे. या पोस्टमध्ये शिकागोमधील भारतीय वकिलाती तसेच भारतीय संरक्षण दल आणि परराष्ट्र मंत्रालयाला या उपक्रमाची माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment