सिक्कीम मधील मनोहारी गुरुडोंग्मार सरोवर

lake
सिक्कीम हे राज्य पर्यटकांचे आवडते आणि लोकप्रिय स्थळ आहेच. याच भागात जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या सरोवरातील एक अतिशय सुंदर असे सरोवर आवर्जून पाहायला हवे. गुरुडोंग्मार सरोवर असे याचे नाव असून ते समुद्रसपाटीपासून ५४३० मीटर म्हणजे साधारण १६५०० फुट उंचीवर आहे. सिक्कीमच्या नितांतसुंदर लाचेन भागात हे सरोवर आहे.

असे सांगतात शिखांचे गुरु नानक या मार्गाने तिबेट येथे जात होते तेव्हा त्यांना वाटेत तहान लागली. तेव्हा त्यांनी तहान भागविण्यासाठी येथील बर्फाच्या जमिनीवर हातातल्या काठीने वार केला त्यातून हे सरोवर निर्माण झाले. त्यानंतर गुरु नानक यांनी हे पाणी प्राशन करून तहान भागविली. या भागात प्रचंड थंडी असते. हे सरोवर थंडीत गोठते तरीही त्याच्या एका भागात जेथे नानक यांनी काठी मारली तो भाग कधीच गोठत नाही असे सांगतात.

हे सरोवर अतिशय मनोहर आहे. चारी बाजूनी बर्फाचे डोंगर असून सरोवराचे पाणी निळेशार आहे. येथे आल्यावर जणू स्वर्गात आल्याचा भास होतो. बौद्ध, शीख आणि हिंदू धर्मियांसाठी हे पवित्र स्थळ आहे. विशेष म्हणजे या सरोवराजवळ फक्त भारतीय नागरिकांना जाण्याची परवानगी आहे. परदेशी पर्यटक चोपता व्हॅलीपर्यंतच येऊ शकतात. लाचेन येथे मुक्काम करून या सरोवरला भेट देण्यासाठी पहाटे निघावे लागते. ६८ किमीचा हा रस्ता अतिशय खडतर असून हे अंतर कापण्यासाठी ४ ते ५ तास लागतात. एप्रिल ते जुलै ही या ठिकाणाला भेट देण्याची चांगली वेळ आहे.

Leave a Comment