भाईजानने आपल्या चित्रपटातून केली आतिफ असलमची हकालपट्टी

salman-khan
मागील आठवड्याच्या गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचे पडसाद आता बॉलीवूडमध्ये देखील उमटत असल्याचे दिसत आहे. बॉलीवूडने पाकिस्तानी कलाकारांवर आता पूर्णपणे बंदी लादली आहे. पाकी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईजने जाहिर केला आहे. पाकिस्तानी गायकांनी गायलेली गाणी म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही हटवली आहेत. पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान अशा पाकी गायकांचा यात समावेश आहे.

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान यानेही आतिफ असलमने गायलेले एक गाणे आपल्या चित्रपटातून काढून टाकले आहे. आतिफ असलमने गायलेले एक गाणे सलमान खान निर्मित ‘नोटबुक’मध्ये होते. सलमानने हे गाणे गाळण्याचा आदेश दिला आहे.

ताज्या माहितीनुसार, आता नव्याने या गाण्याचे रेकॉर्डिंग होणार आहे. हे रेकॉर्डिंगचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. मोहनीश बहल याची मुलगी प्रनुतन आणि जहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा चित्रपट येत्या मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री नूतन यांची प्रनूतन ही नात आहे.

Leave a Comment