मसूद अझहरची सुटका करणारेच आज उलट्या बोंबा मारत आहेत

navjyot-singh-sidhu
नवी दिल्ली – दहशतवादासाठी कोणत्याही एका देशाला जबाबदार धरता येणार नसल्याच्या आपल्या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धु हे कायम असून आपल्या म्हणण्यावर आपण ठाम असून भारताचा लढा कोणत्याही एका देशासोबत नसून तो दहशतवादाविरोधात असल्याचा पुनुरुच्चार त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी अकाली दल आणि भाजपला लक्ष्य करत मसूद अझहरची १९९९ ला त्यांच्याच सरकारने सुटका केल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

मसूद अझहर हा पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्याला जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून कंदहारमध्ये १९९९साली विमान हायजॅक करून दहशतवाद्यांनी केलेली मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी त्यावेळेस सत्तेत असलेल्या भाजप सरकारने मान्य केली होती. त्यांनी याचा संदर्भ देत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

आपला लढा दहशतवाद्यांविरुद्ध असून फक्त सैनिकानेच याची किंमत का चुकवावी, असा प्रश्न त्यांनी विचारला. कोणताही धर्म दहशतवादाला नसल्याचे म्हणत यावर कायमचा तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पाकिस्तान या हल्ल्याला जबाबदार नसल्याच्या त्यांच्या वक्तव्याने देशभरातून असंतोष व्यक्त केला जात आहे. नवज्योत सिंग सिद्धुंच्या राजीनाम्याची मागणी पंजाबच्या विधानसभेत अकाली दलाने लावून धरली आहे. देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Comment