व्हिडीओ; रयतेच्या राजाला मोदींची ट्विटरच्या माध्यमातून मानवंदना

narendra-modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांना अभिवादन केले आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, सत्य आणि न्यायासाठी लढणारे शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. ते समाजातील सर्वच स्तरातील लोकांना आपले राजे वाटत. जय शिवराय.’ या ट्विटमध्ये मोदींनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. मोदींनी या व्हिडीओमध्ये वेळोवेळी आपल्या भाषणांदरम्यान शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख आहे.


मोदी या व्हिडीओमध्ये म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती असून बहुआयामी असे शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व होते. अनेक संकटे असतानाही त्यांनी आपल्या योग्यता आणि क्षमतेच्या आधारे सुशासन आणि प्रशासनाचा भारतीय इतिहासात नवा अध्याय लिहीला. शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती जगाच्या इतिहासात सापडणे मुश्कील आहे, संघर्ष करत असतानाही ज्यांनी सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.

त्यापुढे प्रभू रामचंद्रांचा दाखला देत मोदींनी शिवाजी महाराजांची स्तृती केली आहे. लहान लहान लोकांना, वानरांना एकत्र करुन प्रभू रामांनी आपली सेना स्थापन केली आणि विजय मिळवला. तशाच पद्धतीने शिवाजी महाराजांनी संघटन कौशल्य वापरून शेतकरी आणि मावळ्यांना संघटित करुन युद्धासाठी तयार केल्याचेही मोदी म्हणाले आहेत.

Leave a Comment