कमल हासन – बावळट, बाष्कळ आणि बेजबाबदार

kamal-hasan
संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना आणि त्यात हुतात्मे झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत असताना काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून अभिनेते कमल हसन यांनी पुन्हा स्वतःचा अपरिपक्वपणा उघड केला आहे. एखादी व्यक्ती गप्प बसली असेल तर लोक तिला मूर्ख समजतील, परंतु तिने तोंड उघडले तर तिच्या मूर्खपणावर होते शिक्कामोर्तब होते, अशी एक इंग्रजी म्हण आहे. कमल हासन यांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. कोणीही विचारलेले नसताना आणि गरज नसताना देशविरोधी वक्तव्य करून हासन यांनी स्वतःचेच हसे करून घेतले आहे. आता पक्षाच्या वतीने आपल्या वक्तव्याची सारवासारव हासन यांनी केली असली तरी ‘बूंद से गई वह हौद से नहीं आएगी’, या म्हणीप्रमाणे त्यांच्या या स्पष्टीकरणाचा काही उपयोग होणार नाही.

चेन्नईमध्ये आयोजित एका सभेमध्ये बोलताना हासन म्हणाले, “सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे. जनमत घेतल्यास काश्मीरी नागरिक भारतासोबत येऊ इच्छित असतील, पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित असतील किंवा स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छित असतील, तर ते समजेल. भारत स्वत:ला एक चांगला देश म्हणवत असेल तर अशा प्रकारे वागू नये.” इतकेच नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख त्यांनी आझाद काश्मीर असा करून भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले. केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताने जनमत घेतलेच तर त्यात काश्मीरची जनता विरोधातच मतदान करेल, असे का गृहीत धरल्या जाते असा प्रश्नही त्यांनी विचारला.

त्यांच्या या वक्तव्यावर अपेक्षेप्रमाणे वादाचा धुरळा उडाला. चोहोबाजूंनी त्यांच्यावर टीका होऊ लागली. त्या परिस्थितीत त्यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा लागला. मी माझ्या तीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखाचा संदर्भ देत होतो. त्यात हे वक्तव्य केले होते. आता परिस्थिती बदलली आहे आणि मला तसे म्हणायचे नव्हते, अशा आशयाचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यांच्या मक्कळ निधि मण्ड्रम या पक्षाच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करून हे स्पष्टीकरण देण्यात आले.

प्रचंड प्रतिभावंत अभिनेता म्हणून कमल हासन यांची ओळख आहे. निरनिराळ्या वेशभूषा करून आव्हानात्मक पात्रे उभी करणे हा त्यांचा हातखंडा विषय आहे. मात्र तमिळ चित्रपटसृष्टीतहीएक अहंमन्य आणि स्वकेंद्रित कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रत्येक गोष्ट मीच करणार हा त्यांचा हट्ट असतो. सहाजिकच इतरांपेक्षा आपल्याला जास्त कळते, ही त्यांची नेहमीची वृत्ती आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि समकालीन सुपरस्टार रजनीकांत ज्याप्रकारे नम्रतेसाठी ओळखले जातात तशी ओळख त्यांना कधीही मिळाली नाही. बहुधा त्यामुळे चित्रपटसृष्टीतही ते काहीसे एकटे पडले आहेत.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र चित्रपटाप्रमाणे राजकारणातही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी नोटाबंदीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यानंतर मोदींवर टीका करणे सुरू केले. नंतर त्यांनी केरळमधील कम्युनिस्ट मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची भेट घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते आपला स्वतःचा रस्ता निवडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तितक्यात यांनी काँग्रेससोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष द्राविड मुन्नेट्ट कळगमशीही (द्रामुक) युती करण्याची तयारी दाखवली. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तेव्हा हासन यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.

आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे, की पक्षाच्या स्थापनेला वर्ष उलटून गेले तरी पक्षाची संघटनात्मक बांधणी नाही. या पक्षाचा काही कार्यक्रमही दिसत नाही. द्राविड पक्षांच्या एकेकाऴच्या उत्तर भारताच्या वर्चस्वाच्या विरोधातील कार्यक्रम ते पुढे रेटू पाहत आहेत. मात्र द्रामुक, सत्ताधारी अण्णाद्रामुक आणि अन्य प्रस्थापित पक्ष हेच मुद्दे उचलत असल्यामुळे हासन यांना फारसा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणूनच हासन यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे नेहमी चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

त्यांची ताजी वक्तव्ये ही याच नैराश्यातून आलेली आहेत. येनकेनप्रकारेण चर्चे राहण्याचा त्यांचा खटाटोप आहे. अभिनेता म्हणून कितीही प्रसिद्धी मिळाली असली तरी राजकारणी म्हणून त्यांना कोणी विचारत नाही ही त्यांची खंत आहे. हासन यांचे हे बावळट, बाष्कळ आणि बेजबाबदार वक्तव्य हे त्या नैराश्याचे फलित आहे.

Leave a Comment