या मंदिर आणि मजारींची चीनी, पाक सैनिकांना जरब

harbhajan
आपले शेजारी देश चीन आणि पाकिस्तान म्हणजे देशाच्या घश्यात रुतलेले काटे आहेत. ते धड गिळता येत नाहीत आणि काढूनही टाकता येत नाहीत याचा अनुभव आपण नित्य घेत आहोत. पाकिस्तान दहशतवादी हल्ले करून देशात अशांती राहावी यासाठी सतत प्रयत्न करत असतो तर चीन आपल्या देशात सीमेवर घुसखोरी करून आपला प्रदेश कब्जात घेण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात यासाठी आपली सैन्य दले नेहमीच दक्ष आहेत. पण त्याचबरोबर काही मंदिरे आणि मजारी आपल्या देशाच्या सैनिकांचे रक्षण करत आहेत असा सैन्यदलाचा विश्वास आहे. या ठिकाणी चीनी किंवा पाकिस्तानी जवान चुकूनही हल्ला करण्याचा विचारही करत नाहीत.

भारत चीन सीमेवरील सिक्कीम राज्यातील नथुला खिंडीत बाबा हरभजनसिंग बंकर आहे. हे बाबा सैनिक होते आणि सीमेवर गस्त घालताना त्यांना अपघाती मृत्यू आला. मात्र आजही ते या सीमेवर गस्त घालतात. गस्त घालणाऱ्या सैनिकांना मदतीचा हात देतात. धोक्याची सूचना देतात आणि येणारे संकट टाळतात असा विश्वास आहे. हरभजनसिंग यांचे नाव आजही सैनिक म्हणून नोंदले गेले आहे आणि त्यांना नियमित पगार आणि वर्षाची सुट्टी दिली जाते.

chamaliyal
भारत पाकिस्तान सीमेवर असलेला ३५० वर्षे जुना बाबा दिलीपसिंग मन्हास दर्गा असेच सैनिकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. याला बाबा चाम्लीया दर्गा असेही म्हटले जाते. या दर्ग्यावर पाक सैनिक चुकूनही फायरिंग करत नाहीत. उलट पाकिस्तानातून या दर्गावर वाहण्यासाठी चादर पाठविली जाते. कोणतीतरी दिव्य शक्ती येथे भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे असे पाक सैनिकांचे म्हणणे आहे.

tanot
राजस्थानच्या जैसलमेर सीमेवर असलेले तनोट माता मंदिर असेच पाक सैनिकांचे मनोबल उधवस्त करणारे स्थान आहे. १९७१ च्या भारत पाक युद्धात या मंदिरावर पाकिस्तानने ३ हजार बॉम्ब फेकले. पण त्यातील एकही मंदिरावर पडला नाही. इतकेच नाही तर त्यातील ४५० बॉम्ब फुटलेच नाहीत. कमी सैन्यबाल असूनही भारताच्या सैन्यावर येथे पाकिस्तानला मात करता आली नाही. आजही या मंदिरात न फुटलेले पाकिस्तानी बॉम्ब पाहायला मिळतात.

ghantiyali
तनोट माता मंदिरापासून ५ किमीवर असलेले घंटीयाली माता मंदिर असेच विशेष आहे. येथे १९६५ च्या भारत पाक युद्धात पाक सैनिक या मंदिरात घुसले आणि त्यांनी मूर्ती तोडल्या. पण असा चमत्कार झाला कि मंदिरात घुसलेले सैनिक आंधळे झाले तर परिसरातील पाक सैनिक एकमेकांना शत्रू मानून आपसात लढले आणि मेले असे सांगितले जाते.

Leave a Comment