तिसरे अपत्य झाले म्हणून ६ लाखाचा दंड

child
चीनमध्ये एका जोडप्याला तिसरे अपत्य झाले म्हणून ६४६२६ युआन म्हणजे ६ लाख ८४ हजार रुपये दंड ठोठावला गेला असून हा दंड भरू न शकलेल्या या जोडप्याच्या बँक खात्यातील २२ हजार युआन जप्त करण्यात आले आहेत. चीनी नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. चीन मध्ये जन्मदर घसरत असताना अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आहे. अश्यावेळी अपत्य झाले म्हणून दंड करणे योग्य नाही असे नागरिकांची म्हणणे आहे.

८० च्या दशकात लोकसंख्या स्फोट होण्याची चीन मध्ये भीती निर्माण झाली होती त्यामुळे एक अपत्य पॉलिसी अतिशय कडकपणे राबविली गेली. परिणामी जबरदस्तीने मोठ्या प्रमाणावर गर्भपात केले गेले. त्यातूनही जी दुसरी अपत्ये जन्मली, त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाहीत शिवाय आईवडिलांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कित्येकांनी मुलगा हवा म्हणून पहिल्या मुलींच्या हत्या केल्या, त्यांना कुठेतरी सोडून दिले. याचा परिणाम असा झाला कि आता चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली असून तरुण लोकसंख्या एकदम कमी झाली आहे.

हा धोका लक्षात आल्यावर २०१६ साली पुन्हा दोन अपत्ये जन्माला घालण्यास परवानगी दिली गेली मात्र त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि ज्या जोडप्याचा अर्ज मंजूर होईल तेच दुसरे मुल जन्माला घालू शकतात. चीनची एकूण लोकसंख्या १.३९ अब्ज असून २०१८ मध्ये जन्मदर १.५ कोटींनी घटला आहे.

Leave a Comment