नवज्योतसिंह सिद्धू – पाकिस्तानचा बारावा खेळाडू?

navjyot-singh-sidhu
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) किमान 40 जवान हुतात्मे झाले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. एवढा मोठा दहशतवादी हल्ला झालेला असतानाही सिद्धू यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याचे तुणतुणे चालूच ठेवले. सिद्धू यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध तर केला, मात्र रक्तपात कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी चर्चेचे आवाहनही केले. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) शनिवारी केली.

‘‘काही लोकांच्या कृतीसाठी तुम्ही संपूर्ण देशाला जबाबदार धरू शकता का आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरु शकता का,’’ असा प्रश्न सिद्धू यांनी या हल्ल्यानंतर उपस्थित केला होता. सिद्धू यांना बरखास्त केले नाही तर त्यांनी हे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून केले, असे मानले जाईल असे अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया म्हणाले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या विश्वासार्हतेच्या कसोटीचा क्षण आहे, असेही ते म्हणाले.

नवज्योतसिंग सिद्धू यांची ओळख क्रिकेटपटू म्हणून होती. त्यानंतर समालोचक म्हणून त्यांनी नाव कमावले. त्यावेळी त्यांच्या काही गमतीशीर टिप्पणीमुळे त्यांनी लोकप्रियता मिळविली. त्यानंतर टीव्हीवरील रियालिटी शोमध्ये दिसू लागले. तेथेही यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. त्या बळावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी जे मिळवले ते राजकारणात त्यांनी घालवले असेच म्हणावे लागेल. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षातून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण भाजपमध्येही त्यांची कामगिरी उजवी म्हणावी अशी नव्हती.

त्यात काँग्रेसमध्ये आल्यापासून आणि राज्यमंत्रीपद मिळाल्यापासून वारे प्यायलेल्या वासरासारखे ते उधळले आहेत. गेल्या दोन वर्षांत अमरिंदर सिंह आणि राहुल गांधी या दोघांना अडचणीत आणणारी एकही संधी त्यांनी सोडली नाही. मग ते इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहणे असो किंवा त्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांची गळाभेट घेणे असो. कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानात गेलेले असताना सिद्धू यांनी तेथे काळ्या तितरच्या त्वचेपासून बनलेला एक पुतळा आणला होता. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शीख यात्रेकरूंसाठी दरबार साहिब गुरुद्वाऱ्यासाठी कर्तारपूर मार्गिका सुरू करणे, हा पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने रचलेला व्यापक कट आहे असे एकीकडे त्यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणत असताना ते स्वतः या प्रकरणी आयएसआयच्या हातचे खेळणे बनले होते.

केवळ वावदूक विधाने करून सिद्धू यांनी वाद ओढवून घेतला असता तर गोष्ट वेगळी होती. मात्र त्यांनी सतत भारताच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात तसेच पाकिस्तानच्या पथ्यावर पडेल अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे. त्याच्या कृतीही त्याच पद्धतीच्या आहेत.

पुलवामाच्या हल्ल्यावरून संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे. प्रत्येक देशभक्त या हल्ल्यात बळी पडलेल्या जवानाबद्दल हळहळ करत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपले राजकीय मतभेद बाजूला सारून या संकटाचा मुकाबला करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत त्याला छेद देईल अशी विधाने करण्याचे सिद्धू यांना काहीही कारण नव्हते.

तरीही स्वभावाला औषध नाही या उक्तीप्रमाणे त्यांनी पाकिस्तानची भलामण केली. त्यामुळे विरोधी पक्ष बाजूला राहू दे पण त्यांच्या स्वतःच्या पक्षात केवढा दोष उत्पन्न झाला आहे, की पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्यांना दांडी मारावी लागली. या बैठकीत हजर होण्याएवढे धैर्यसुद्धा त्यांच्याकडे नव्हते. काँग्रेसचेच नेते पवन दिवाण यांनी सिद्धू यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून गद्दार या शब्दात त्यांची संभावना केली आहे.

अभिजित मुजुमदार या ज्येष्ठ पत्रकाराने केलेली टिप्पणी मोठी मार्मिक आहे. “देश एकवेळ चेतन शर्मा याने शेवटच्या चेंडूवर दिलेल्या (जावेद मियांदादला) षटकाराबद्दल त्याला माफ करेल परंतु पाकिस्तानचा बारावा खेळाडू म्हणून काम करणाऱ्या सिद्धूला कधीही माफ करणार नाही,” असे ते म्हणाले. आजच्या घडीला तरी देशवासीयांची हीच भावना आहे.

Leave a Comment