
नवी दिल्ली – गुरुवारी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे पुन्हा एकदा सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून यात सीमा सुरक्षा दलाचे तीन जवानांसह मेजर पदावरील एक अधिकारी शहीद झाले आहेत.
पुलवामात दहशतवाद्यांच्या नापाक हल्ल्यात पुन्हा चार जवान शहीद
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना पुलवामामधील पिंगलान येथे दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाली होती. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यानुसार त्या परिसरात शोध मोहिम राबवली असता तेथे लपून असलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंधाधुद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना रुग्णालयात ताबडतोब दाखल करण्यात आले. पण यातील चार जवानांचे उपचार दरम्यान निधन झाले. शहीद झालेल्यांमध्ये एका मेजराचा देखील समावेश आहे. दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले असून चकमक अद्याप सुरु असून या चकमकीत एक नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
