युरोपला चिंता आता जेहादी वधूंची

jihadi
सीरियामधील इस्लामिक राज्य (इस्लामिक स्टेट किंवा इसिस) या दहशतवादी गटात युरोपातील अनेक युवक-युवती सामील झाले होते. आता इसिसचा पाडाव झाल्यानंतर ही मंडळी स्वगृही परतू पाहत आहेत. त्यावरून युरोपमध्ये चर्चेला तोंड फुटले असून त्यांना परत घ्यावे का नाही, यावरून दोन तट पडले आहेत.

ब्रिटनमधील एका गर्भवती शाळकरी मुलीने अशा प्रकारे घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्याप्रमाणेच ब्रिटनच्या अनेक महिला सीरियातील युद्धभूमीवरून परतू पाहत आहेत. शमीमा बेगम असे या मुलीचे नाव आहे. आपल्या दोन मैत्रिणींसह शमीमाने ब्रिटनमधून 2015 मध्ये पलायन केले होते. त्यावेळी विविध माध्यमांमध्ये त्यांनी प्रसिद्धी मिळविली होती. त्यामुळे तिला परत घेण्यास अनेकांचा विरोध आहे. “बेगमसारख्या लोकांमध्ये आपल्या देशासाठी द्वेष ठासून भरला आहे. माझा संदेश स्पष्ट आहे – जर तुम्ही परदेशात दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला असेल तर तुमच्या पुनरागमनाला मनाई करण्यास मी हयगय करणार नाही,” असे ब्रिटनचे गृहसचिव साजिद जाविद यांनी द टाइम्स वृत्तपत्राला सांगितले.

मात्र ब्रिटनच्या परकीय गुप्तचर संस्था एम16चे प्रमुख एलेक्स यंगर यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटीश नागरिक असल्यामुळे तिला परत येण्याचा अधिकार आहे. परंतु ती आलीच तर तिला खटल्याला सामोरे जावे लागेल. म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फरन्स या आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना यंगर म्हणाले की, इसिससाठी लढलेल्या किंवा तिला पाठिंबा दिलेल्या लोकांच्या परत येण्याने ते अत्यंत चिंतित आहेत. इसिस ही एक चिवट संघटना असून इराक आणि सीरियामध्ये तिने काही प्रदेश गमावला असला, तरी ती पुन्हा आकार घेत आहे, असे यंगर म्हणतात. दुसरीकडे एम16चे माजी प्रमुख रिचर्ड बॅरेट यांनी लेख लिहून बेगमच्या परत येण्याची भलामण केली आहे. मात्र परंपरावादी माध्यमांनी तिला रोखण्याचा आग्रह धरला आहे.

ब्रिटनला गेल्या काही वर्षांत अनेक जिहादी हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत इसिसमध्ये सामील होण्याच्या या मुलींच्या निर्णयामुळे ब्रिटिश नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. एक प्रकारचा अविश्वास निर्माण झाला होता. बेगम ही सध्या 19 वर्षांची आहे. ती तिसऱ्यांदा गर्भवती आहे. तिची पहिली दोन मुले सीरियातील एका निर्वासित शिबिरात मरण पावली होती. मात्र आजही तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नाही.
पूर्व सीरियात सात ब्रिटीश महिला आणि त्यांची 15 मुले बगौझ या गावातून पळून गेले असून ते निर्वासितांच्या शिबिरात गेले आहेत, असे टेलिग्राफ वृत्तपत्राने म्हटले आहे. यातील दोन महिलांशी या वृत्तपत्राने संवाद साधला तेव्हा त्यांनी ब्रिटनमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केली.

या ताज्या प्रकरणाने जिहादी वधूंच्या (जिहादी ब्राईड्स) समस्येकडे पुन्हा जगाचे लक्ष वेधले गेले आहे. संपूर्ण युरोपातून अशा शेकडो तरुणी इसिसमध्ये सामील झाल्या होत्या. आता त्यांचे भवितव्य अनिश्चित असून त्यांच्या येण्याने समाजाला धोका असल्याचे सर्वसाधारण मत आहे. इसिसने 2014 मध्ये सीरियात आपली खिलाफत जाहीर केली होती. त्यानंतर पाश्चिमात्य देशांतील शेकडो महिला त्या देशात पोचल्या. यातील काहींनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला तर काहींचे दहशतवाद्यांशी लग्न लावून देण्यात आले.

गेल्या वर्षी उत्तर सीरियामध्ये अमेरिकेच्या मदतीने कुर्द सैन्याने 800 विदेशी महिलांना ताब्यात घेतले होते. “येथील चार शिबिरांमध्ये सुमारे 800 महिला त्यांच्या मुलाबाळांसह आहेत. त्या महिला सुमारे 40 देशांच्या आहेत. यात कॅनडा, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, ट्युनिशिया, येमेन, तुर्की आणि ऑस्ट्रेलियाच्या महिलांचा समावेश आहे,” असे ह्यमून राईट्स वॉच या संघटनेचे संचालक नदीम हूरी यांनी डी वेल्ट या जर्मन वृत्तपत्राला सांगितले होते. यातील काही स्त्रिया इसिसच्या दहशतवादी बनल्या, तर काही जणींनी आपल्याला फसवून जिहादी वधू बनण्यासाठी इराक आणि सीरियाला नेण्यात आल्याची तक्रार केली होती.

कुर्दिश अधिकाऱ्यांना या महिलांवर कारवाई करण्यात फारसा रस नव्हता. उलट त्यांना त्यांच्या मूळ देशांमध्ये परत पाठविण्याची इच्छा होती. मात्र फ्रान्स, ब्रिटन आणि बेल्जियमसह अनेक देशांनी कुर्दिश अधिकाऱ्यांना विरोध केला होता. इसिससाठी लढलेले हजारो दहशतवादी या देशांत परतत आहेत आणि त्यांची समस्या कशी हाताळावी, हाच या देशांपुढील मोठा प्रश्न आहे. एकुणात या महिला आता त्यांच्या देशांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत, एवढे नक्की.

Leave a Comment